Mon, Jul 15, 2019 23:49होमपेज › Satara › संवादासाठी ‘मराठी’ चांगलं माध्यम

संवादासाठी ‘मराठी’ चांगलं माध्यम

Published On: Feb 27 2018 8:55AM | Last Updated: Feb 27 2018 8:53AMपाटण : गणेशचंद्र पिसाळ 


‘ मराठी असे आमुची मायबोली ’ हे जरी सत्य असले तरी अलीकडच्या काळात यावर इंग्रजीने घेतलेला कब्जाही निश्‍चितच सामाजिक विचार करायला लावणारा आहे .मराठीचा एक हुंकारदेखील समोरच्याचं आख्ख आयुष्यच बदलून टाकतो इतका प्रभाव या भाषेचा आहे. त्यामुळे मराठी माणूस टिकला पाहिजे त्याहीपेक्षा कितीतरी पटीने मराठी भाषा टिकवली पाहिजे. सध्याच्या वाद नको म्हणून संवादच टाळण्याच्या 

अपप्रवृत्तीमुळे आपणच आपल्या भाषा व संवादापासून लांब तर जात नाही ना ? याचा आता सार्वत्रिक विचार होणे गरजेचे बनले आहे. 

अलिकडच्या काळात प्रांत असो किंवा भाषा यामध्ये संवादापेक्षाही वादाचं महत्त्व आणि महात्म्य अधिक वाढल्याच चित्र पहायला मिळत आहे. यात मोबाईल व संगणकीय युगामुळे मुळातच एकमेकांमधला संवाद संपला आहे. यांत्रिकी आणि व्यावहारिक भाषेत मग शॉर्टकट मध्ये इंग्रजी माध्यमांचा सर्रास वापर होत असताना मग त्या हाय, हॅलोत भले भावना नसतील पण कृत्रिम व्यवहार पाळला जातोय एवढच. परंतु मराठी शब्दात मांडलेली अथवा व्यक्त केलेली भावना ही थेट काळजापर्यंत पोहोचली जाते. तिच्या प्रत्येक शब्दातील सामर्थ्य निश्‍चितच सर्वव्यापी प्रेरणादायी ठरते. या भाषेतील इंजेक्शन हे दंडात अथवा खुब्यात न बसता थेट काळजालाच बसते. आणि मग वादातून संवाद व संवादातून आपोआपच सुसंवादही साधला जातो हे अधिक महत्त्वाचं.    भाषा म्हणजे जबरदस्तीने न्हवे. हातात छडी घेऊन होणारा प्रयोग हा शालेय शिक्षणापूरताच मर्यादीत ठीक आहे. मात्र आता याच भाषांसाठी अंदोलने करण्याची वेळ आपल्यावर का आली ?  याचा दोष परप्रांतीयांवर लावण्यापेक्षा जर आपणच आपल्यातील संवाद आणि तोही मातृभाषेतून केला तर मग सक्तीसाठी हातात छडी किंवा दांडके घ्यायची गरजच उरणार नाही. यासाठी मुळातच लेखन व वाचन संस्कृती अधिकाधिक सुदृढ होणे गरजेचे आहे. मराठीचे धडे इंग्रजीमधून देणार्‍या राज्यकर्त्यांकडून याच्या अपेक्षा ठेवणेही तितकेच घातक असल्याने मग आता मराठी फुलविण्यापेक्षा ती टिकवणे हेच खरे आव्हान आहे. मात्र मराठी माणूस ज्यावेळी भावनेने पेटतो त्यावेळी त्याच्यासाठी या बाबी अशक्य नाहीतच हेदेखील तितकेच सत्य आहे . पूर्वी माध्यमांची मर्यादा ही भाषांसाठी सुरक्षितता होती. मात्र अलीकडच्या काळात माध्यमे वाढली आणि यात मातृभाषा हेच खरे संवादाचे माध्यम हे आपणच विसरून गेलो. त्यामुळे मग हे पाश्‍चिमात्य ’ डे ’ संस्कृती आपल्यात अलगद घुसली आणि आपल्यालाही आपल्याच मातृभाषांची आठवण करून देणे गरजेचे बनले. 

ताटातील मिठाप्रमाणे आपणच जर आपल्याच भाषेचा मर्यादीत वापर करू लागलो तर निश्‍चितच इतर भाषांचा पगडा अथवा आक्रमक हे वाढणारचं. त्यामुळे यावर कोणाला दोष न देता व कोणाकडून अपेक्षाच न ठेवता प्रत्येकानेच आपल्या मातृभूमी इतकेच मातृभाषेवरही प्रेम केले. संवाद, लेखन, वाचन व पारायणांचे सोहळे केले तर मग हीच आपली मायमराठी सर्वार्थाने समृद्ध होईल. आणि प्रत्येकालाच आपल्य ’ मराठी ’ भाषेचा अभिमान व गर्वही वाटेल हे निश्‍चित.