Wed, Apr 24, 2019 19:47होमपेज › Satara › आ. शिवेंद्रराजे : खा.उदयनराजेंनी सहभागी होण्याचे आवाहन

मराठीच्या ‘अभिजात’साठी आंदोलनाचे नेतृत्व करणार

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 11:23PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 26 जानेवारीला नवी दिल्ली येथे होणार्‍या धरणे आंदोलनाचे नेतृत्व शिवछत्रपतींचा वारसदार या नात्याने करणार असल्याची माहिती आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, खा. उदयनराजे यांनी या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा द्यावा तसेच लोकसभेत प्रश्‍न उपस्थित करावा, असे आवाहनही आ. शिवेंद्रराजेंनी केले. 

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हा 11 कोटी मराठी भाषिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते मराठी अभिजात भाषा देण्यासाठीच्या मोहिमेचा शुभारंभ सातारा येथे झाला होता. मराठी भाषा अभिजात समितीचे अध्यक्ष  प्रा. रंगनाथ पठारे यांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध होईल आणि मराठीच्या विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ या सातारकर मंडळींनी पुढाकार घेऊन चळवळ उभी केली ही अभिमानाची गोष्ट आहे. मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह प्रा. रंगनाथ पठारे यांनीही या पुढाकाराचे कौतुक केले आहे. 26 जानेवारीला आपण सर्व मराठीजनांनी दिल्लीला धडक द्यायची असून, या आंदोलनाचे नेतृत्व शिवछत्रपतींच्या घराण्याचा वारसदार म्हणून मी स्वीकारले आहे, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले. 

या आंदोलनाला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सक्रीय पाठिंबा देऊन लोकसभेत हा प्रश्‍न उपस्थित करावा, असे आवाहनही आ. शिवेंद्रराजे यांनी केले. दरम्यान, सुरुचि राडा प्रकरणानंतर प्रथमच आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदारांना आवाहन केल्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. याप्रश्‍नी त्यांनी खा. संभाजीराजे यांनाही पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. तसेच मराठी बांधवांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून याविषयी ट्विट करुन पंतप्रधान मोदींना टॅग करावे. याचप्रमाणे अन्य सोशल मिडियाच्या व्यासपीठावरुन लक्ष वेधावेे, असे आ. शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले. 

आ. शिवेंद्रराजेंनी साहित्य परिषदेच्या सर्वच उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. या लढ्याचे नेतृत्व त्यांनी स्वीकारल्याबद्दल साहित्य परिषदेच्यावतीने त्यांचे आभार मानतो. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याचा दिवस जवळ आला असून अंतिम धडक मारण्यासाठी सर्व भेदाभेद विसरून या राजकारणविरहित लढ्यासाठी मराठीजनांनी कंबर कसावी. याबाबत राज्यातील सर्व खासदारांशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे विनोद कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी किशोर बेडकिहाळ, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, मसाप शाहूपुरीचे डॉ. उमेश करंबळेकर उपस्थित होते.