Sat, Mar 23, 2019 02:24होमपेज › Satara › भगिनींचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

भगिनींचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:21PMकराड ः प्रतिनिधी

मराठा समाजातील भगिनींच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी कराड व मलकापूर मधील भगिनींनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवला. त्याचबरोबर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठिंबा देत मराठा समाजासाठी शासनाशी संघर्ष करण्याची ग्वाही दिली. दरम्यान, सोमवारी चाफळ येथील रोहन तोडकर याच्या कुटुंबियांसाठी 35 हजारांच्या मदतीचे धनादेश मान्यवरांनी मराठा भगिनींच्या हवाली केले.

1 ऑगस्टपासून मराठा भगिनींच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास कराडमधील दत्त चौकात प्रारंभ झाला आहे. साखळी पद्धतीने सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनात सोमवारी कराड व मलकापूरमधील मराठा भगिनींसह बांधव सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाची फसवणूक करणार्‍या राज्य शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या धु्रवतेज सौरभ पाटील याच्यासह अबालवृद्धांनी केलेल्या घोषणाबाजीने दत्त चौक परिसर दणाणून गेला होता.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, मलकापूरचे माजी बांधकाम सभापती शंकरराव चांदे, प्रकाश बागल यांच्यासह कराडचे नगरसेवक सुहास जगताप, इंद्रजित गुजर, लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील यांच्या पत्नी गौरवी पाटील, माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, इंद्रजित चव्हाण, नगरसेवक सुहास जगताप, बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.

तोडकर कुटुंबियांसाठी 40 हजार

कराड समाज बांधवांनी नवी मुंबईत आंदोलनावेळी हत्या झालेल्या खोनोली (ता. पाटण) येथील रोहन तोडकर कुटुंबियांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत रविवारपर्यंत 94 हजार रूपयांची मदत तालुक्यातील समाज बांधवांनी केली होती. सोमवारी दुपारपर्यंत पटवेकर यांच्यासह नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी पाच हजार, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव यांनी चार हजार, नगरसेवक इंद्रजित गुजर आणि सुहास जगताप यांनी प्रत्येकी पाच हजार, महालक्ष्मी स्टीलचे केतन गुंदेशा यांनी अकरा हजार तर कोयना अ‍ॅटोमोबाईलचे भास्करराव देवकर यांनी पाच हजार असे 35 हजारांचे धनादेश मराठा भगिनींच्या हवाली केले.

मुस्लिम बांधवांचाही आंदोलनाला पाठिंबा

आंदोलनाच्या सहाव्या दिवशी कराडचे नगरसेवक फारूख पटवेकर यांच्यासह झाकीर पठाण, आदम पालकर, शाबीर मुल्ला यांच्यासह कराड शहर व परिसरातील तसेच तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी पाठिंबा दिला. तसेच यावेळी पटवेकर यांनी तोडकर कुटुंबियांच्या मदतीसाठी 5 हजारांचा धनादेश दिला.