कराड : प्रतिनिधी
कराड तालुका मराठा भगिनींनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनास रविवारी पाचव्या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत पाठिंबा दिला. त्याचबरोबर कराडमधील क्रांती अॅटो रिक्षा गेटच्या सदस्यांनी कराड शहरातील ‘रिक्षा रॅली’ही काढली. शासनाने मराठा समाजाची दिशाभूल चालवली असल्याचा आरोप करत सलग पाचव्या दिवशीही जोरदार निदर्शने करण्यात आली.
रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पाचव्या दिवशीच्या ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. त्यानंतर कराडचे राष्ट्रवादीचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे राज्य अध्यक्ष सारंग पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, जितेंंद्र डुबल यांच्यासह क्रांती रिक्षा युनियनचे सदस्य, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी यांनी आंदोलनस्थळी भेट देत मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
त्याचबरोबर रविवारी ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या घोणशी, खोडशी, वहागाव परिसरातील महिला भगिनींसह युवतींनी दुपारी एकच्या सुमारास जोरदार घोषणाबजी करत जोरदार निषेध नोंदवला. शासनाने मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांवर दोन वर्षानंतरही गांभीर्याने पाऊल उचललेले नाही. शालेय फी पन्नास टक्के माफ करण्याचे सांगण्यात येत असले तरी केवळ शैक्षणिक फीवर सवलत दिली जात आहे. त्यामुळे शिक्षण संस्था अन्य प्रकारांचा वापर करत विद्यार्थ्यांनाकडून नेहमीप्रमाणेच फी वसूल केली जात आहे. त्यामुळेच मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आतातरी गांभिर्याने पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पाठिंबा...
रविवारी सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सागर आमले, नामदेव थोरात, करपे बंधू यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनस्थळी हजेरी लावत पाठिंबा दिला. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचे निवेदनही यावेळी देण्यात आले.