Mon, Apr 22, 2019 12:33होमपेज › Satara › धोंड्यांना दुग्धाभिषेक; गाजर वाटप 

धोंड्यांना दुग्धाभिषेक; गाजर वाटप 

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:56PMफलटण : प्रतिनिधी  

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथील अधिकारगृह इमारतीसमोर गेले 5 दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान सोमवारी सकाळी आंदोलनस्थळी 2 धोंड्यांना दुग्धाभिषेक घालून गाजराचे वाटप असा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 2 वर्षांहून अधिक काळ केंद्र व राज्य शासनांना शांततेच्या मार्गाने आवाहन करण्यात येत असून शासन मात्र आश्‍वासनांच्या गाजराची खैरात करत असल्याचे नमूद करीत हे अनोखे  आंदोलन करण्यात आले. 

मराठा समाज जसा शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढतो, ज्याची दखल संपूर्ण जगाने घेत मराठा समाजाचे अभिनंदन केले तोच मराठा समाज रस्त्यावर उतरला तर सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद घेवून शासनाने आता वेळकाढूपणाचे धोरण सोडून देवून मराठा आरक्षणाचा गांभीर्याने विचार करुन निर्णय करावा, अशी मागणी  आंदोलनकर्त्यांनी केली. 

राज्य सरकारने आता अधिक वेळ न दवडता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल दि. 9 ऑगस्ट या क्रांतीदिनापर्यंत मागवून घेवून त्याच दिवशी सर्व बाबींची पूर्तता करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा यापुढे या सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी मराठा समाजाला तीव्र आंदोलन आणि समाजाची एकसंधता  दाखवून द्यावी लागेल. ज्या मराठा समाजाच्या जीवावर हे सरकार सत्तारुढ झाले त्यांच्या मंत्र्यांना आता अधिककाळ रस्त्यावर फिरु न देण्याचा इशारा या आंदोलनादरम्यान देण्यात आला आहे. 

गुरुवार दि. 26 पासून अधिकार गृह इमारतीसमोर गेले सलग 5 दिवस ठिय्या आंदोलन सुरु असून त्यामध्ये तालुक्याच्या विविध भागातील पूर्वनियोजित गावे आणि शहरातील मराठा समाज बांधव, स्त्री/पुरुष प्रामुख्याने तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. सोमवारी साखरवाडी, फडतरवाडी, खुंटे, शिंदेवाडी, तरडगाव, सुरवडी, निंभोरे, वडजल, गारपीरवाडी, नांदल आणि पंचक्रोशीतील तसेच फलटण शहरातील मराठा समाज बांधव ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. 

मंगळवार दि. 31 रोजी आसू, पवारवाडी, ढवळेवाडी, शिंदेनगर, हणमंतवाडी, गुणवरे, खटकेवस्ती, साठेफाटा, मठाचीवाडी, राजाळे, तामखडा आणि पंचक्रोशीसह फलटण शहरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने  या ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहे. 

दरम्यान, फलटण वकील संघाच्यावतीने आंदोलनस्थळी येवून आंदोलनाला पाठींबा देण्यात आला. आगामी  काळात या आंदोलनानिमित्ताने कोणतेही गुन्हे दाखल झाल्यास त्यासाठी न्यायालयात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहे. ठिय्या आंदोलनादरम्यान विविध ठिकाणची भजनी मंडळे, भारुड, किर्तनकार आंदोलनस्थळी येवून भजन, किर्तन व भारुड सादर करीत असल्याने संपूर्ण परिसराला एक वेगळेच स्वरुप प्राप्त झाले आहे.