Mon, Sep 24, 2018 18:51



होमपेज › Satara › दहिवडीत आरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार 

दहिवडीत आरक्षण मागणीसाठी मराठ्यांचा एल्गार 

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:37PM



दहिवडी : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मराठा समाज समन्वयक समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर मोर्चे व ठिय्या आंदोलने  केली जात आहेत. माण तालुक्यातही मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार करत सर्व पक्ष, गटतट सोडून समाजासाठी एकवटत रस्त्यावर उतरला आहे. पाच हजारांच्यावर मराठा समाजबांधव व महिला भगिनींच्या उपस्थितीत दहिवडीत भगवामय वातावरणात भव्य रँली काढत समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला करण्यात आले.

दहिवडी ता. माण येथे माण तालुका मराठा समाजाच्यावतीने श्री सिध्दनाथ मंदीराजवळ उपस्थित राहून जेष्ठ नागरीकांच्या हस्ते मराठा समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून एक मराठा लाख मराठा , आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ,छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ,जयभवानी जयशिवाजी ,मराठा खडा तो सरकारसे बडा अशा घोषणा देत दहिवडी शहरातून शांततेने रँली काढली.यावेळी दहिवडी शहर भगवामय झाल्याचे दिसून येत होते. शांततेने व आचारसंहितेचे पालन करत रस्त्यावर तीन रांगा करत रँली तहसिल कार्यालयासमोर गेल्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे ,जगन्नाथ सोनवणे , रोहण तोडकर या सहकार्‍यांनी आपला जीव गमवाला असून त्यांना श्रध्दांजली वाहत समाजाने ठिय्या आंदोलन सुरू केले.

आरक्षणासाठी शासन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असून समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे.आरक्षण नसल्यामुळे आपल्यावर होणार्‍या अन्यायाचा पाढा अनेकांनी वाचला.आरक्षण नसूनही आमची मुले जिद्द , चिकाटी , आत्मविश्वासाने यश खेचून आणत आहेत.आरक्षण मिळाले तर समाजाचा सर्वांगीण विकास होणार आहे.आरक्षणासाठी शासनाला 9 ऑगस्टपर्यंत समन्वय समितीच्या वतीने अंतिम तारीख देण्यात आली आहे.तोपर्यंत शासनाने आरक्षण दिले तर ठिक अन्यथा त्यापुढे समाज शांत बसणार नाही. मराठा समाजाची सहनशीलता आजपर्यंत शासनाने पाहिली आहे या पुढे तसे होणार नाही.मोघलांना सळो की पळो करून सोडणारे हे मावळे शासनाला सळो की पळो करून सोडतील.अशा तीव्र भावना व्यक्त केल्या गेल्या.

संयमी मोर्चाने जिंकली सर्वांचीच मने

दहिवडी चा आज बाजार होता.बाजारातून तीन ओळीत रांगेत मोर्चा पुढे गेला.शेकडो बाजारकरी व व्यापारी यांना मराठा मोर्चाचे शिस्तबद्ध तेचे दर्शन घडले.छत्रपती शिवरायांच्या आकर्षक मूर्ती मोर्चाच्या अग्रभागी होती.त्यामुळे मोर्चात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.