Wed, May 22, 2019 16:34होमपेज › Satara › सातार्‍यात मराठ्यांचा जनसैलाब

सातार्‍यात मराठ्यांचा जनसैलाब

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 11:05PMसातारा : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाकडून मराठा आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून होत असताना त्यावर कुठल्याही सरकारने ठोस निर्णय घेतला नाही. मूक मोर्चे काढूनही दखल न घेणार्‍या राज्य सरकारला ठोक मोर्चांनी वाकवले. मात्र, आरक्षणावर शिक्‍कामोर्तब करायला चालढकल करणार्‍या सरकारचा निषेध करत जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षणासाठी एल्गार केला. जिल्हाभरातील मराठा समाज बांधवानी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाने राजधानी सातार्‍यात पुन्हा जनसैलाब उसळला.

सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यातील तहसील कार्यालये तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनांचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी 9.30 वाजल्यापासून मराठा समाज बांधवांनी आंदोलनाची तयारी पूर्ण केली. त्यानंतर थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलकांच्या भगव्या झेंड्यांनी आंदोलन परिसर भगवा बनून गेला होता.

आंदोलनाच्या सुरुवातीस संयोजकांनी रणांगणात शौर्य गाजवणार्‍या व पराक्रमाची गाथा सांगणार्‍या मराठ्यांच्या इतिहासाचे पोवाडे सुरू केले. त्यातून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुन्हा समाजासमोर मांडला. त्यामुळे आंदोलनाचे वातावरण अगदी भारुनच गेले होते. त्यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी राजमाता जिजाऊ यांना नमन करणारे वंदनगीत सामुहिकपणे गायले. त्यानंतर पोवईनाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. अधूनमधून पडणार्‍या ऊनाचे चटके सहन करत, पाऊसधारा अंगावर घेत मराठे पुन्हा हक्‍काच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनासाठी बसले.

त्यावेळी युवकांनी केलेल्या शिवगर्जनांनी परिसर दणाणला. ‘एक मराठा, लाख मराठा,’ ‘आरक्षण आमच्या हक्‍काचं, नाही कुणाच्या बापाचं,’ ‘तुमचं-आमचं नात काय-जय जिजाऊ जय शिवराय,’ ‘कोण म्हणतं देत नाय, घेतल्याशिवाय रहात नाय,’ ‘रक्‍ता-रक्‍तात भिनलंय काय, जय जिजाऊ जय शिवराय,’ ‘ हर हर, महादेव,’ ‘जय भवानी, जय शिवाजी,’ ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,’ ‘देताय की जाताय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. या आंदोलनात एका चिमुकल्याने केलेल्या शिवगर्जनेने आणि शिवगीतांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. आंदोलनात सर्व क्षेत्रातील मराठा समाजबांधव गटतट, मतभेद विसरुन एकत्र आले. या आंदोलनात महिला तसेच मुलींचा लक्षणीय सहभाग होता. दुपारी 12.30 नंतर आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होवू लागले.

सातारा शहर, परिसर, तसेच जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातून आंदोलक याठिकाणी गटागटाने दाखल होवू लागले. छत्रपती शिवरायांच्या भगव्या पतका खांद्यावर घेवून मावळ्यांचे जथ्येच्या जथ्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर येवून धडक जनसागरास मिळत होते. तहान-भूक विसरुन मराठा समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केले. अधीमधी होणारी शिवगर्जना उपस्थितांमध्ये चैन्य निर्माण करायची. घोषणांनी तरुणांचे रक्‍त सळसळायचे. जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारपर्यंत जनसैलाब उसळला. क्रांती दिनी सकल मराठा समाजाने नवी क्रांती घडवली.

यावेळी समन्वय समितीच्यावतीने बोलताना  हरीष पाटणे म्हणाले, सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षणासाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने 58 मार्चे काढले. मात्र, सरकारकडून ठोस उपाययोजना न करता प्रत्येक वेळी आश्‍वासने दिली जात आहेत.  ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने मराठा समाजाने आंदोलनाची धार वाढवत ‘ठोक मोर्चे’ काढले. आरक्षण आपल्या हक्‍काचे आहे. आपल्या हक्‍कासाठी आपण लढत आहोत. पण हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न काही अपप्रवृत्‍ती करत आहेत. आपल्या आसपास गुढपणे वावरणार्‍या, संशयास्पद व्यक्‍ती आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे. हे आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन शरद काटकर यांनी केले. सरकारने दिलेले आश्‍वासन न पाळल्यास आपल्या न्याय्य हक्‍कासाठी भविष्यात यापेक्षाही भयानक, तीव्र आंदोलने करावी लागतील, असा इशारा मराठा समाजबांधवांनी दिला. 
जिल्हाधिकार्‍यांकडून सातारा शहर, परिसरात पाहणी

मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन शांततते पार पडावे यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी गुरुवारी सकाळी स्वत: बाहेर पडून सातार्‍याचे प्रवेश मार्ग असणार्‍या प्रत्येक  ठिकाणी परिस्थितीची पाहणी केली. शिवराज पेट्रोलपंप चौक, अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉॅरंट चौक, वाढे फाटा, मोळाचा ओढा आदी ठिकाणी जाऊन जिल्हाधिकार्‍यांनी  संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांशी चर्चा करून सूचना केल्या. सातारा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख, सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांचेही परिस्थितीवर लक्ष होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारकवर हे दिवसभर कार्यालयात तळ ठोकून होते.