Sun, Mar 24, 2019 12:53होमपेज › Satara › मराठा आरक्षण : गुरूवारपासून मुंबईत ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षण : गुरूवारपासून मुंबईत ठिय्या आंदोलन

Published On: Aug 19 2018 5:26PM | Last Updated: Aug 19 2018 5:25PMकराड : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा युवकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसह मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी कराड (जि. सातारा) येथील मराठा भगिनीच्या वतीने मुंबई येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. गुरूवार, २३ ऑगस्टपासून आझाद मैदानावर महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू होणार असून त्यामध्ये राज्यातील महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा भगिनींच्यावतीने यावेळी करण्यात आले आहे. कराडमध्ये मराठा भगिनींसह मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मराठा भगिनींनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 

कराडमध्ये आज झालेल्या मराठा समाज समन्वय समितीच्या बैठकीत मुंबईमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा महिला भगिनींनी घेतला. त्यानुसार मुंबईमधील आझाद मैदानावर गुरूवार, 23 ऑगस्टपासून मराठा महिला भगिनी ठिय्या आंदोलन सुरू करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसह समाजाच्या इतर सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन स्थगित केले जाणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

आझाद मैदानावर केल्या जाणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व कोणाकडेही दिले जाणार नाही. मराठा समाजाच्या सर्व मागण्या शासनाला माहिती असून त्याबाबतचे निवेदन शासनाला दिले जाणार आहे. त्यानंतर मात्र मराठा समाजाचा कोणीही प्रतिनिधी, नेता ठिय्या आंदोलनाला बसलेल्या महिलांचे किंवा या आंदोलनाचे नेतृत्व म्हणून शासनाबरोबर किंवा इतर कोणाशीही चर्चा करणार नाही. मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्या मान्य कराव्यात, एवढी आमची शासनाकडे कळकळीची विनंती असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

क्रांतीची सुरुवात कराडमधून होते. त्याचप्रकारे संपूर्ण राज्यभर सर्वप्रथम मराठा महिलांच्या ठिय्या आंदोलनाची सुरुवात 1 आँगस्टला कराडमधून झाली होती. या आंदोलनाची धग आणखी वाढविण्यासाठी आम्ही कराडमधील महिला मुंबईमध्ये आझाद मैदानावर ठिय्या आंदोलनाला बसणार असल्याचा निर्धार कराडमधील मराठा भगिनींनी व्यक्त केला आहे. कराडमधून सुरू झालेले महिलांचे ठिय्या आंदोलन शासनाकडून मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत सुरू ठेवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्याला मराठा समाजातील सर्व घटकांचे सहकार्य मिळेल, असा आशावादही कराडमधील मराठा समाज महिला समन्वय समिती सदस्य व मराठा महिला भगिनींनी व्यक्त केला.