Wed, Mar 20, 2019 23:35होमपेज › Satara › मराठा आंदोलक आज मुंडन करणार

मराठा आंदोलक आज मुंडन करणार

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 10:43PMफलटण : प्रतिनिधी  

मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने येथील अधिकार गृह इमारतीसमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन तिसर्‍या दिवशीही कायम असून रविवारी सकाळी राज्य सरकारचा निषेध म्हणून मराठा युवक मुंडन करणार आहेत. यावेळी मुंडन झाल्यानंतर राज्य सरकारचे श्राद्ध घालण्यात येणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरु राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी सकल  मराठा समाज बांधवांनी फलटणमध्ये ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. तिसर्‍या दिवशी या आंदोलनाची व्याप्‍ती आणखी वाढली.  मराठा समाज बांधव प्रामुख्याने तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. आरक्षण मागणीकडे भाजपा सरकारने चालढकल केल्यास हातात काठ्या घेऊन राडा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्री मंडळातील सहकार्‍यांना रस्त्यावर फिरु  न देण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असेही समाजाकडून सांगण्यात आले आहे.

शासनाने मराठा समाजाची सत्व परिक्षा पाहू नये अन्यथा शांततेने सुरु असलेल्या आंदोलनातील कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यास त्याची जबाबदारी पूर्णत: शासनावर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज यांची सासुरवाडी आणि मराठ्यांचा योध्दा छ. संभाजी महाराज यांचे फलटण हे आजोळ असून येथे सुरु असलेले आंदोलन शांतता व संयमाने सुरु आहे. तरुणांचे भविष्यात होणारे नुकसान टाळून आरक्षणाच्याबाबतीत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

ठिय्या आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास  पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. आजच्या तिसर्‍या  दिवशी राजुरी, मुंजवडी, बरड, पिंप्रद, गुणवरे, वाजेगांव, दुधेबावी, मिरढे, नाईकबोमवाडी, निंबळक आणि पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.