Sun, Aug 18, 2019 20:46होमपेज › Satara › तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर ठिय्या

तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर ठिय्या

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 10:59PMकराड : प्रतिनिधी

राज्य शासनाकडून मराठा समाजाच्या होणार्‍या फसवणुकीचा निषेध नोंदवत कराड तालुका सकल मराठा समाज भगिनींनी बुधवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. या आंदोलनात तालुक्याच्या विविध भागांतील भगिनी दररोज साखळी पद्धतीने ठिय्या आंदोलन करणार आहेत. राज्य शासनाचा निषेध नोंदवत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्‍त करण्यात आला. तसेच प्रसंगी मुंंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोरही ठिय्या आंदोलनाचा इशारा मराठा भगिनींनी दिला आहे.

राज्यातील मराठा समाज बांधवांसह कराड तालुक्यातील मराठा समाज बांधव आक्रमक झाला  आहे. लोकशाही व शांततेच्या मार्गाने कराडात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आठवडाभरापूर्वी कडकडीत बंद पाळत कराड तहसील कार्यालयासमोर 24 जुलैला ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतरही शासन मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेत नसल्याचा निषेध नोंदवत मराठा भगिनींनी बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला आहे.

बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मराठा भगिनींनी ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी मराठा भगिनींनी आपआपली मते व्यक्त करताना शासनाचा जोरदार निषेध नोंदवला. एका भगिनींनीने आक्रमकपणे मत नोंदवत प्रसंगी मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. 

दरम्यान, हे ठिय्या आंदोलन साखळी पद्धतीने करण्यात येणार असून गुरूवार, 2 ऑगस्टला हजारमाची, ओगलेवाडी परिसर, 3 ऑगस्टला घारेवाडी, पोतले, येणके, सुपने, तांबवे परिसर, 4 ऑगस्टला सैदापूर, बनवडी परिसर, 5 ऑगस्टला वारूंजी, खोडशी, घोणशीसह परिसर, 6 ऑगस्टला मलकापूर व कराड शहर परिसर, मंगळवार 7 ऑगस्टला कोपर्डे हवेली, मसूर, उंब्रज, पाली परिसर आणि 8 ऑगस्टला कार्वे, वडगाव, शेणालीसह आटके, वाठार परिसरातील मराठा भगिनी साखळी पद्धतीने ठिय्या आंदोलन करणार आहेत. वरील गावाव्यतिरिक्त तालुक्यातील अन्य सर्व गावांतील मराठा भगिनींना आंदोलनास सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायंकाळी 5.30 वाजता राष्ट्रगीताने पहिल्या दिवसाच्या ठिय्या आंदोलनाची सांगता झाली. गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलन पुन्हा सुरु होणार आहे. 

काँग्रेस आमदारांकडून तोडकर कुटुंबियांना 2 लाख

कराडमधील ठिय्या आंदोलनास काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य आनंदराव पाटील यांनी उपस्थिती लावत एक मराठा म्हणून मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत समाज बांधवांना खंबीरपणे पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. तसेच नवी मुंंबईत मराठा आंदोलनावेळी हत्या करण्यात आलेल्या रोहन तोडकर याच्या मारेकर्‍यांना शोधून कठोर कारवाईची मागणी करत तोडकर कुटुंबियांना दोन लाखांची मदतही यावेळी आ. आनंदराव पाटील यांनी जाहीर केली.