Sun, May 26, 2019 19:04होमपेज › Satara › मराठ्यांचा संताप अन् पोलिसांचा संयम!

मराठ्यांचा संताप अन् पोलिसांचा संयम!

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 10:43PMकराडः अमोल चव्हाण

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली होती. यावेळी अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले. मात्र प्रचंड तणाव असतानाही कराड याला अपवाद ठरले. ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून मराठा युवक आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त करत होते. त्याचवेळी पोलिस तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून आंदोलनकर्त्या मराठा युवकांना शांततेचे आवाहन करत होते. कोणत्याही क्षणी बंदला हिंसक वळण लागू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाही पोलिसांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळल्याने कराड शहर व तालुक्यात मराठ्यांनी पुकारलेला बंद कडकडीत पण तणावपूर्ण शांततेत पार पडला.  बंदला कोणतेही गालबोट न लागता बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचे समाधान मराठा बंधवांच्या चेहर्‍यावर दिसत होते. तर दुसर्‍या बाजूला दिवसभर मराठा युवकांचा उद्रेक असतानाही बंदला कोणतेही गालबोट न लागल्याने पोलिस समाधानी झाले होते.

9 ऑगस्ट रोजी बंदला सुरुवात झाली. सकाळपासून बंद अतिशय शांततेत सुरू होता. व्यापार्‍यांसह नागरिकांनी स्वतःहून सर्व व्यवहार बंद ठेवून मराठ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. काही तुरळक प्रमाणावर रस्त्यावर वाहतूक सुरू होती. ही बाब लक्षात येताच प्रथम ओगलेवाडी येथे मराठा बांधव जनावरांसह रस्त्यावर उतरले. ओगलेवाडी येथे रस्ता रोको झाल्याची माहिती युवकांना समजताच कृष्णा कॅनॉलवरही आक्रमक भूमिका घेत मराठा भगिनींसह युवक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला. त्यांनी रस्त्याच्या बाजूला लावलेल्या फलकाची मोडतोड करून ते रस्त्यावर टाकून रस्ता अडविला. दरम्यान त्याच वेळी कराडमध्येही मराठा युवकांनी एकत्र येत शहरातून मोटारसायकल रॅली काढली. या जमावाला विद्यानगर येथे रस्ता आडविल्याचे समजताच शहरातून मोटरसायकल रॅली काढणारा जमाव विद्यानगर कॅनॉलवरती जाऊन धडकला. बघता बघता काही वेळातच हजारोंचा मराठा जमाव कृष्णा कॅनॉलवर जमला. जमलेला जमाव कोणत्याही क्षणी आक्रमक होऊन मोडतोड करण्याची शक्यता निर्माण झाली होती. अतिशय तीव्र भावना व्यक्त करत मराठा युवक घोषणाबाजी करत होता. याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जीप मधून उतरून जमावाला शांततेचे आवाहन केले.

परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या जमावाने पोलीस अधिकार्‍यांंनाच घेराव घातला. अधिकार्‍यांच्या भोवती जमावाचा गराडा पडल्याने पोलिस कर्मचारी लगेच तेथे जमा झाले. पोलिसांचा जमाव ऐकत नाही हे लक्षात येताच अधिकार्‍यांनी तिथून बाजूला होत मराठा समन्वय समितीच्या महिला सदस्यांबरोबर चर्चा केली. मराठा शांततेने आंदोलन करतो मात्र काही समाजकंटक जमावामध्ये दंगा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब पोलिस अधिकार्‍यांनी सैदापूर मधील नेतेमंडळी व मराठा महिला सदस्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, हे लक्षात येताच पोलिस जीपच्या स्पीकरवरून मराठा महिला समन्वयकांनी आवाहन केल्यानंतर काही प्रमाणात जमाव शांत झाला. मोठ्या प्रमाणावर विद्यानगर कॅनॉलवरती पोलिस जमा झाल्याने आता पोलिस मराठा युवकांची धरपकड करतील, अशी शक्यता होती. मात्र तसा कोणताही निर्णय न घेता पोलिसांनी अगदी हात जोडून जमावाला शांततेचे आवाहन केले. आणलेल्या पोलिस फौजफाटा तेथेच उभा करून त्यांनी जमावावरती दबाव निर्माण केला. काही वेळाने पोलिसांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन तेथून हळूहळू जमाव पांगला. कॅनॉल वरील तणावपूर्ण परिस्थिती शांत होत असतानाच कोल्हापूर नाका व पलाशा हॉलच्या समोर मोठ्या प्रमाणावर युवक जमा झाले.

त्यांनी महामार्गावरच तोडलेली लाकडे टाकून महामार्ग अडविला. त्यामुळे रस्ता रोको झाल्याने वाहनांची रस्त्यावरच रांग लागली ही माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे हे स्वतः पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत पलाशा हॉलच्या समोर गावागावातून मोठ्या प्रमाणावर युवक सहभागी झाले होते. त्याच वेळी काही संघटनांचेही युवक या आंदोलनात सहभागी होऊन जोरजोरात घोषणाबाजी करत होते. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा युवक हळूहळू बाजूला होऊ लागले. मात्र काही आक्रमक झालेला युवक तेथून हटण्याचे नाव घेत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी तेथेही मोठा पोलिस बंदोबस्त वाढवला. मात्र तरीही आक्रमक जमाव रस्त्यावरून बाजूला होत नव्हता. येथेही पोलिसांनी अतिशय संयमाने व शांततेने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी प्रयत्न केले. त्यातूनही एका जीपवर जमावाने हल्ला चढविला.

मात्र पोलिसांनी त्यावेळीही संयमाने जमावाला शांततेचे आवाहन केले. आक्रमक जमावावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहिले नाही, असे वाटत असतानाच मराठा समन्वयक व काही नागरिकांनी रस्त्यावर उतरलेल्या जमावाला शांततेचे आवाहन केले. सुमारे तीन तासानंतर आक्रमक झालेला जमाव तिथून बाजूला झाला. तरीही कोल्हापूर नाक्यावर जमलेला जमाव काही केल्या तिथून बाजूला होत नव्हता. येथेच मोठा तणाव निर्माण झाला. दरम्यान पलाशजवळ जमलेला जमाव पांगल्याने सातारा बाजूकडून कोल्हापूर बाजूकडे वाहतूक सुरू झाली, ही बाब लक्षात येताच कोल्हापूर नाक्यावरील निम्मा जमाव दुसर्‍या बाजूला जाऊन त्यांनी सागर हॉटेल समोर महामार्ग अडविला. येथे मालट्रक चालकांना धाक दाखवून मराठा युवकांनी ट्रक महामार्गावर आडवे लावण्यास भाग पाडले. 

मराठा युवकांना पोलीस बळाचा वापर करून बाजूला करता आले असते. परंतु तसा कोणताही निर्णय पोलिसांनी किंबहुना डीवायएसपींनी घेतला नाही. कारण सकाळपासून प्रचंड तणाव असतानाही बंद संपूर्ण तालुक्यात शांततेत सुरू आहे आणि त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये. हीच अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांची भावना होती. त्यामुळेच त्यांनी मराठा युवकांच्या आक्रमक व उद्रेकाला कुठेही पोलीस बळाचा वापर करून नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट बळापेक्षा संयम ठेवून हात जोडून विनंती करण्याबरोबरच शांततेचे आवाहन पोलिसांकडून मराठा बांधवांना केले जात होते. त्यामुळेच पोलिसांचा संयम पाहून किंबहुना पोलिस कोणतीही अ‍ॅक्शन घेणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर मराठा बांधवांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. 

कोल्हापूर नाक्यावरील जमाव हटवण्यासाठी पुन्हा पोलिसांनी शक्कल लढवली. कराडमध्ये नऊ दिवस ठिय्या आंदोलनास बसलेल्या मराठा बंधू-भगिनींना पोलिसांनी विनंती करून येथील जमाव पंगविण्याचे आवाहन केले. त्यानुसार मराठा समन्वय समिती सदस्यांनी कोल्हापूर नाक्यावरील जमावाला आवाहन केले. कोल्हापूर नाक्यावरील प्रचंड आक्रमक झालेला जमाव घोषणाबाजी देत रस्त्यावरून बाजूला झाला. इथेही पोलीस मोठ्या प्रमाणावर फौजफाटा घेऊन तयार होते. त्यांनी ठरवले असते तर बळाचा वापर करून जमावाला पांगवले असते. परंतु असा कोणताही निर्णय न घेता पोलिसांनी अतिशय शांततेने व संयम ठेवून मराठ्यांनी पुकारलेला बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. पोलिसांचा हा संयम निश्‍चितच मराठा आंदोलकांची ताकद वाढवणारा ठरला.