Tue, May 21, 2019 18:11होमपेज › Satara ›  कराडात मराठ्यांनी महामार्ग रोखला

 कराडात मराठ्यांनी महामार्ग रोखला

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 25 2018 11:01PMकराड : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठ्यांनी पुकारलेल्या बंदला शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी मराठा बांधवांनी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढली. कोल्हापूर नाक्यावर आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रोखल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होता. दुपारी मराठा युवक अचानक मंडईत घुसल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. तर संतप्त जमावाने अलंकार हॉटेलवर दगडफेक करून काचा फोडल्या. तालुक्यातही सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. काही ठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला.    मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासह विविध 

मागण्यासाठी परळी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार कराड शहर व परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी कोल्हापूर नाक्यावर मराठा बांधव जमा झाले. त्यांनी मोटरसायकल रॅलीस सुरुवात केली. या रॅलीमध्ये अनेक ठिकाणी युवक सहभागी होत होते. ही रॅली शहर पोलिस ठाण्यासमोरून दत्त चौकातून पुढे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून चावडी चौकात आली. यावेळी युवक जोरजोरात घोषणाबाजी करत होते. 

मराठा बांधवांची रॅली चावडी चौकातून कन्याशाळेसमोरून कृष्णा नाका व तेथून कृष्णा पुलावरून विद्यानगरकडे गेली. तेथून कॉलेज परिसरातून सैदापूर मार्गे पुन्हा रॅली शहरात आली. उपजिल्हा रुग्णालयासमोरून विजय दिवस चौकातून भेदा चौक व तेथून पुन्हा कोल्हापूर नाक्यावरून रॅली महामार्गावरून मलकापूरमध्ये गेली. मलकापूरमधून पुन्हा रॅली कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. याचदरम्यान, महामार्गाच्या दुसर्‍या बाजूस पंकज हॉटेलसमोर उड्डाणपुलावर काही युवकांनी एसटीवर दगडफेक करून महामार्गावरच रास्तारोको केला. या घटनांमुळे महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहतुक ठप्प झाली होती. तर कोल्हापूर नाक्यावर काहीकाळ तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठ्यांनी  काहीवेळात महामार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत केली. 

दरम्यान, रॅली संपल्यानंतर मोटरसायकलवरून शहरात आलेल्या युवकांचा जमाव अचानक मंडईमध्ये घुसल्याने तणाव निर्माण झाला होता. मंडईत जमाव गेल्याचे कळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाट मंडईत दाखल झाला. त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. यावेळी काहींनी जमावाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आक्रमक झालेला जमाव तेथून बाहेर पडला. 

त्याच सुमारास बसस्थानक परिसरात जमलेल्या युवकांच्या जमावाने हॉटेल अलंकारवर दगडफेक करून हॉटेलच्या काचा फोडल्या. त्यामुळे बसस्थानक परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बाजार समितीत व्यापार्‍यांंचे टेम्पोमध्ये माल भरण्याचे काम चालू होते. आंदोलक बाजार समितीत पोहचताच दुकाने तातडीने बंद करण्यात आली. 

तसेच, कराड-विटा मार्गावर ओगलेवाडी येथे सकाळी रस्त्यावरच टायर पेटविले. त्याचबरोबर वारुंजी फाटा, कराड-मसूर मार्गावर दत्तनगर येथे पेटते टायर रस्त्यावर टाकण्यात आले. तर कार्वे येथेही कृष्णा नदीच्या पुलावर युवकांनी टायर पेटविल्याने वाहतुक ठप्प झाली होती.  

मराठ्यांच्या गनिमीकाव्याने पोलिसांची भंबेरी...

सकाळी मराठ्यांच्या मोटरसायकल रॅलीस सुरुवात झाल्यानंतर शहरातील विविध भागातून रॅली काढल्यानंतर युवक परत जातील, असा विचार प्रशासनाने केला असावा. म्हणूनच कदाचित कोल्हापूर नाक्यावर पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त दिसून येत नव्हता. मात्र, कोल्हापूर नाक्यावर रॅलीची सांगता झाल्यानंतर मराठा युवकांनी रस्त्यावरच ठाण मांडून महामार्ग रोखला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. तेथून पुन्हा जमाव शहरातून जात असताना अचानक मंडईमध्ये घुसल्याने पोलिसांचा फौजफाट मंडईत दाखल झाला. एखाद्या घटनेच्या ठिकाणी पोलिस पोहचत असतानाच दुसरीकडे काहीतरी घडल्याचे पोलिसांना कळत होते. त्यामुळे मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली.