Mon, Apr 22, 2019 16:39होमपेज › Satara › मराठा आरक्षणप्रश्‍नी विशेष अधिवेशन : रामराजे 

मराठा आरक्षणप्रश्‍नी विशेष अधिवेशन : रामराजे 

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:26PMफलटण : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणप्रश्‍नी तुमचा आवाज शासनापर्यंत पोहोचला असून विशेष अधिवेशन बोलवणार असल्याचे स्पष्ट करतानाच मार्ग निघेल, असा विश्‍वास व्यक्‍त करत त्यासाठी थोडा अवधी देण्याची आणि आंदोलन शांततेच्या मार्गाने चालवण्याचे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दि. 24 रोजी फलटण बंद यशस्वी केल्यानंतर दि. 26 पासून येथील अधिकारगृह इमारतीसमोर गेले 8 दिवस ठिय्या आंदोलन सुरू     असून या आंदोलनात मराठा समाजातील स्त्री/पुरुष विशेषत: तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. आंदोलनस्थळी भजन, किर्तन, प्रवचन, भारुड होत असतानाच आंदोेलनासंबंधी माहिती देणारी, आरक्षणाची आवश्यकता पटवून देणारी भाषणेही अभ्यासकाकडून येथे दिली जात असल्याने संपूर्ण परिसर आरक्षण या एकाच विषयाने चर्चेत राहिला आहे. या आंदोलनस्थळी आज सायंकाळी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट दिली. 

राणे समितीच्या शिफारशी शासनाने स्विकारल्या त्याची अंमलबजावणीही झाली मात्र या समितीच्या शिफारशी स्वीकारण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले त्यावेळी आपण विधान परिषद सभापतीपदावर नव्हतो मात्र राणे समितीच्या शिफारशी आणि शासनाचा निर्णय याची पूर्ण माहिती असल्याने राणे समितीच्या निर्णयाला आव्हान दिले गेल्यानंतर आपण स्वत: फलटणकरांच्या माध्यमातून एक संघटना स्थापन करुन त्या आव्हानाला उच्च न्यायालयात प्रतिआव्हान त्याचवेळी दिले असल्याचे निदर्शनास आणून देत  तुमचा वकील म्हणून शासनासमोर सर्व बाजू स्पष्टपणाने मांडून आपण या प्रश्नाचा मराठा समाजाच्याबाजूने निर्णय होईल मात्र त्याचा इतरांवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेवून आरक्षणाच्या प्रश्नासाठी निश्चितपणाने मराठा समाजाला दिलासा देण्याचा आपला व शासनाचा प्रयत्न असल्याचे ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

मराठा आरक्षणाबाबतच्या आपल्या प्रतिक्रीया मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या आहेत त्याचप्रमाणे राज्यभर विशेषत: फलटण येथे शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती मुख्यमंत्र्यांना आहे त्याशिवाय गरज वाटली तर वकील म्हणून मुख्यमंत्र्यांसमोर याविषयी अधिक बाजू मांडून कोणाचेही काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आपण ठाम असल्याचे ना. रामराजे यांनी स्पष्ट केले. 
आरक्षणप्रश्नी मराठा समाजाने केलेली आंदोलने, शांततेच्या मार्गाने काढलेले मोर्चे आपल्याला ज्ञात आहेत किंबहुना शासनाकडेही त्याची नोंद आहे. मात्र मराठवाड्यात सुरु असलेले आंदोलन मनाला वेदना देणारे असल्याने त्या मार्गाचा फारसा उपयोग होणार नाही.

शासनावर दबाव आणण्याचा आता प्रश्न राहीला नाही शासन आरक्षण देण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र कायदेशीर बाबी, घटनेतील तरतुदी या सर्वाचा विचार करुनच आरक्षणाचा निर्णय घेणे उचित ठरेल अन्यथा पुन्हा न्यायालयात हा प्रश्न गुंतला तर सर्वांचीच अडचण होणार असल्याने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवा दि. 9 ऑगस्टच्या क्रांती दिनानंतरही आंदोलन वेगळ्या मार्गाने न नेता संयम आणि शांततेने आंदोलन चालवणे हिताचे असल्याने शांतता आणि संयम ढळू देवू नका आत्मक्लेषाची भूमिका घेवू नका शांतता आणि संयमाची येथील परंपरा सांभाळा त्यातूनच लोकांचा असलेला पाठींबा टिकविणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट करतानाच  या जिल्ह्यातून आंदोलनप्रश्नी चर्चा करण्यासाठी एक किंवा दोन व्यक्तींची नावे निश्चित करण्याची गरज स्पष्ट करतानाच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून अशा पध्दतीने प्रतिनीधींची निवड करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत शासन या प्रश्नात सकारात्मक असल्याचे ना. रामराजे यांनी स्पष्ट केले. 

प्रारंभी सुभाषराव शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने श्रीमंत रामराजे यांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात आंदोलनाची संपूर्ण पार्श्वभूमी विषद करीत शांततेच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन हिंसक होण्यापूर्वी या प्रस्नाचा निकाल लागण्याची, योग्य निर्णय होण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. शासनातील सर्वोच्चपदावर आपण विराजमान आहात आपला आदेश शासन नाकारणार नाही हे लक्षात घेवून आपण या प्रश्नात मराठा समाजाला योग्य न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी शासनाकडे आमची बाजू मांडावी, अशी अपेक्षा सुभाषराव शिंदे यांनी व्यक्त केली. 

मराठा सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार यांनी मराठा पेटला तर तो शांत होत नसल्याचे निदर्शनास आणून देत शासनाने आता वेळ न दवडता तातडीने आरक्षण द्यावे यासाठी आपण आपला शब्द शासनाकडे खर्ची करावा अशी विनंती श्रीमंत रामराजे यांना करताना आरक्षण जाहीर करुन मेगा भरतीमध्ये मराठा समाजातील तरुणांना मोठ्या संख्येने सामावून घेण्याची मागणी मराठा समाजातील लोकांनी केली.