Tue, Jul 16, 2019 00:27होमपेज › Satara › मेढ्यात युवकांचे शोले स्टाईल आंदोलन

मेढ्यात युवकांचे शोले स्टाईल आंदोलन

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 26 2018 10:51PMकुडाळ / मेढा : प्रतिनिधी

मराठा समाजाने आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन व केलेल्या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा हातात घेतलेल्या झेंड्याचा दांडा काढून तो शासनाच्या विरोधात उगारला जाईल, असा इशारा जावली तालुक्यातील मराठा बांधव-भगिनींनी ठिय्या आंदोलनादरम्यान दिला आहे.

‘एक मराठा, लाख मराठा’, कोण म्हणतोय देत नाय, घेतल्या शिवाय रहात नाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. मुख्यालय बंद ठेवून  मराठा मावळ्यांनी मेढा- महाबळेश्‍वर रस्त्यावर चक्का जाम करून अर्धा तास वाहतूक ठप्प केली. दरम्यान, शासनाच्या निषेधांनी मेढा परिसर दुमदुमून गेला. पावसाची तमा न बाळगता दांडूक हातात घेवून हजारो मराठा बांधव-भगिनी सहभागी झाल्या होत्या. तहसिल कार्यालयासमोर असणार्‍या उंच इमारतीवर काही युवकांनी चढून  घोषणाबाजी केली. या युवकांनी शोले स्टाईलने आंदोलन करत  जिल्हाधिकारी आल्याशिवाय खाली न उतरण्याची भूमिका घेतली. जिल्हाधिकारी न आल्यास इमारतीवरून उड्या टाकण्याचा इशाराही दिला. दरम्यान, प्रांताधिकारी स्वाती देशमुख व तहसिलदार रोहिणी आखाडे यांनी आश्‍वासन दिल्यानंतर युवक इमारतीवरून खाली उतरले. यावेळी काहीकाळ प्रशासनाची तारांबळ उडाली.

जावली पंचायत समितीपासून मोर्चाला प्रारंभ झाला. मेढ्याच्या मुख्य बाजारपेठेत मोर्चा दाखल झाल्यानंतर मराठा स्वंयसेवकांनी उपस्थित समाजासमोर शासनानाने आपल्या मागण्याकडे लक्ष वेधीत करावे याकरता असणार्‍या मागण्यांचे वाचन केले. त्यानंतर मेढा तहसीलदारांना मराठा भगिनींच्या हस्ते निवेदन देण्यात आले आहे. 

मराठा समाजाच्या मागण्यांचा शासनाने विचार करुन ऑगस्ट क्रांती दिनाच्या आत मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा सरकारला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.  शासनाचा निषेध व्यक्त करत   तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या मोर्चाला जावली तालुक्यातील मेढा, कुडाळ, करहर, सायगाव, केळघर विभागातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने हजर झाले होते. या आंदोलनादरम्यान मेढा पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या ताफ्यामुळे मेढा परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

फलटणला बेमुदत ठिय्या आंदोलन

फलटण  : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी गुरुवारपासून येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला शहर व तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांसह  महिला, युवक, युवती सहभागी झाले होते. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा बांधवांनी  तहसील परिसर दणाणून सोडला होता.

प्रारंभी फलटणमध्ये छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहीद काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिकारगृह इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या प्रशस्त शामियान्यात आणि त्याबाहेरही हजारोंच्या  संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते. आंदोलनस्थळीच मराठा भगिनींच्या हस्ते प्रांताधिकारी संतोष जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

फलटण शहर व तालुक्यात मंगळवारी शांततेच्या मार्गाने बंद यशस्वी करुन मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले. आज गुरुवारी अधिकारगृह इमारतीसमोर ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पहिल्या दिवशी विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह विविध राजकीय पक्षातील मंडळी या प्रश्‍नावर एकत्र आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.