होमपेज › Satara › मराठा आरक्षण आंदोलन : सहकारमंत्र्यांकडून सातार्‍यात भाजपमधील मराठा नेत्यांची चर्चा

मराठा आरक्षण आंदोलन : सहकारमंत्र्यांकडून सातार्‍यात भाजपमधील मराठा नेत्यांची चर्चा

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 10:47PMसातारा : प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणासाठी कसे प्रयत्नशील आहेत आणि त्यांना या विषयावर कसे अडचणीत आणले जात आहे, याची माहिती भाजपमध्ये जे मराठा नेते आहेत आणि ज्यांचा खास करुन ‘मराठा क्रांती मोर्चा’शी संबंध आहे, अशा पदाधिकार्‍यांना दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी सातार्‍यात येवून भाजपमधील मराठा सामाजातील नेते व पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. 

‘मराठा क्रांती ठोक महामोर्चा’मुळे सरकारविरोधात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी निर्माण झालेली विरोधी प्रतिमा पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावतीने ‘मराठा क्रांती’वर चर्चा करण्यासाठी मंत्री सुभाष देशमुख सकाळी सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आले. त्यानंतर ‘मराठा क्रांची मोर्चा’मध्ये कार्यरत असणारे परंतु भाजप पक्षात असणारे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई, सातारा पालिकेतील भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे त्याचबरोबर अन्य काही मंडळीही मंत्र्यांना भेटण्यासाठी तात्काळ शासकीय विश्रामगृहावर पोहोचली.  

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्‍तव्याचा मराठा समाजातून तीव्र निषेध होत आहे.  मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा आता राज्यभरात सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यात झालेल्या महामोर्चामध्ये मुख्यंत्र्यांच्या अनुषंगाने गंभीर घोषणाबाजी करण्याबरोबरच निषेधही व्यक्त करण्यात आला होता. काही ठिकाणी त्यांच्या भाषणाच्या क्लिपही ऐकवल्या गेल्या. राज्यातील बहुतांशी भागात मोर्चा, महामोर्चा, बंद अथवा आंदोलने झाली त्याठिकाणी  मुख्यमंत्रीच रडारवर राहिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ त्यांची एक टीम राज्यभरात कार्यरत झाली आहे. बहुतांशी मंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यात पाठवून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा कशी चांगली आहे आणि भाजप सरकार कसे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहे, याची माहिती देण्यात येत आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यात भाजपमध्ये असणारे परंतु ‘मराठा क्रांती’शी संबंधित काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्याचबरोबर जिल्ह्यात महामोर्चामध्ये घडलेला अनुचित प्रकार, मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील घोषणाबाजी याचा आढावा घेतला.  ज्या युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी अल्पवयीन किती, यामध्ये कोणी बाहेरचे होते का, याचीही विचारणा केली. दरम्यान, ज्या युवकांवर 307 चे गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी काहींचा या दगडफेकीशी संबंधही नाही. त्यामुळे त्यांच्याबाबतीत सहानभूतीपूर्वक विचार करण्यात यावा, अशी मागणीही मंत्री देशमुख यांच्याकडे अनिल देसाई, धनंजय जांभळे व अन्य पदाधिकार्‍यांनी केली. यावेळी ना. देशमुख यांनी जिल्हा बँकेचे कौतुक केले. बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असली तरी त्यांच्याकडून बँकेचा कारभार चांगला असल्याचेही  त्यांनी सांगितले.