Sat, Mar 23, 2019 02:37होमपेज › Satara › कराडात मराठ्यांचा ‘ठोक मोर्चा’

कराडात मराठ्यांचा ‘ठोक मोर्चा’

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:56PMकराड : प्रतिनिधी

शांततेच्या मार्गाने राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढल्यानंतरही शासनाला जाग आली नाही. त्यामुळे आता ठोक मोर्चा काढून आरक्षण घेणारच असा निर्धार करत कराडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तालुक्यातील गावागावातून आलेले हजारोंच्या संख्येने मराठा युवक सहभागी झाले होते. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेत बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करत परळी येथे ठिय्या आंदोलनास बसलेल्या मराठा समाज बांधवांना पाठिंबा देण्यात आला.

परळी येथील मराठा समाज बांधवांनी गेली आठ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कराड शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवानी दोन दिवसापुर्वी बैठक घेऊन येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी तालुक्यातील गावागावात समाज बांधवांच्या बैठका घेऊन ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला युवकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबाही मिळत होता. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही याबाबत जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे कराडमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा युवक ठिय्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यामुळे मंगळवारी कराडमध्ये होणार्‍या मोर्चाकडे व ठिय्या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. 

त्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच गावागावातील प्रमुख चौकात मराठा युवक जमा होऊन मिळेल त्या वाहनाने कराडमध्ये येत होते. सकाळी 9 वाजल्यापासूनच येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा बांधव जमा होऊ लागले. मराठा मोर्चाचे समन्वयक आंदोलनकर्त्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यातबाबत वेळोवेळी सुचना देत होते. 10 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर समाजबांधवांची गर्दी दत्त चौकात झाली. तरीही काही गावातील युवक आम्ही येत असल्याचे निरोप देऊन मोर्चा थोडावेळ थांबविण्याचा आग्रह करत होते. सकाळी 11 वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव दत्त चौकात जमा झाला. यावेळी मोर्चाच्या संयोजकांनी मराठा क्रांती मोर्चाची आचारसंहिता समाजबांधवांना सांगितली. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या काकासाहेब शिंदे यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून थोडावेळ शांतता पाळण्यात आला. 

त्यानंतर दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. मोर्चात सर्वात पुढे भगवा झेंडा घेतलेले युवक सहभागी झाले होता. त्यानंतर महिला व भगिनी होत्या. तर त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या पाठीमागे मराठा युवक मोर्चात सहभागी झाले होते. दत्त चौकातून निघालेला मोर्चा तालुका पोलिस ठाण्यासमोरून भेदा चौकात आला. 

तेथून मोर्चा थेट तहसील कार्यालयासमोर आला.  मोर्चादरम्यान, मराठा युवकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रुपांतर झाले. यावेळी अनेकांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्‍त केल्या. 

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांततेत मोर्चे काढले. मात्र त्या मोर्चांची शासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही. मराठ्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे यापुढे मराठा क्रांती मोर्चा मूक मोर्चा नव्हे तर ठोक मोर्चा काढणार आहे. 

त्याची ही सुरवात असून शासनाने मराठ्यांच्या मागणीचा विचार करून आरक्षण जाहीर करावे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. परंतु, शांततेच्या मार्गाने काढलेल्या मोर्चाची शासनाने दखल न घेता उलट पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांना येण्यास विरोध केला म्हणून त्यांनी वारीमध्ये मराठ्यांनी साप सोडला असता असे वक्‍तव्य करून समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. खरे तर मराठा समाज हा साप सोडणार नव्हे तर म्यानातून तलवार उपसणारा व शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा समाज आहे. 

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करू नये. मराठा युवकांनी तलवारी हातात घेतल्यानंतर प्रशासन बंदुका हातात घेणार आहे, याचीही आम्हाला कल्पना आहे. मात्र, ती वेळ आम्ही प्रशासनावर येऊ देणार नाही. 

शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणार्‍या मराठा समाजावर मुख्यमंत्र्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. 
मुख्यमंत्र्यांनी एक लक्षात ठेवावे की, आरक्षणासाठी आंदोलन करून मोर्चा काढणारा मराठा समाज असून वारीमध्ये सहभागी होणारे वारकरीही मराठा समाजाचेच भाऊबंद आहेत. त्यामुळे पंढरपूरला तुम्ही गेला असता तर मराठा युवक नव्हे तर वारकर्‍यांनीच तुम्हाला अडविले असते. वारकर्‍यांच्या हातात भगवा झेंडा असला तरी त्या झेंड्याला असणारी काठी वारकर्‍यांच्या हातात होती. मराठा समाजाने दिलेल्या इशार्‍यामुळेच मुख्यमंत्री पंढरपूरला येऊ शकले नाहीत, असेही अनेक वक्त्यांनी सांगितले.