Wed, May 22, 2019 10:46होमपेज › Satara › बाजार समितीचा आठवडी बाजार रद्द

बाजार समितीचा आठवडी बाजार रद्द

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 9:07PMकराड : प्रतिनिधी

गुरूवार, 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर कराड शेती उत्पन्न बाजार समितीमधील आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. रिक्षा संघटनांनाही बंदला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेवरही बंदचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कराड शहरातील गुरुवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

कराड तालुका मराठा समाज बांधवांनी आठवडाभरापासून दत्त चौकात सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन बुधवारी स्थगित केले. त्यापूर्वी येथील अंजठा रिक्षा युनियनच्या पदाधिकार्‍यांनी मराठा भगिनींच्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत अशी मागणी करत गुरूवारच्या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर राजस्थानी जैन समाज बांधवांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला. तसेच बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे यावेळी जाहीर केले. दरम्यान, शेती उत्पन्न बाजार समितीकडून गुरूवारचा जनावरांचा बाजार रद्द केला आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कराड आगारातून ज्या ग्रामीण भागात मुक्कामी एसटी जातात, त्याही न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एसटी वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे.

प्रशासन विशेषत: पोलिसांनीही बंदवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कंबर कसली आहे. लोकांनी शांतता व संयम राखण्याबरोबर कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी हिम्मत खराडे, पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेत ठराव घ्या : निवासराव थोरात

सातारा जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सभेत मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांचा विचार करून त्याबाबत ठराव घेण्यात यावा, अशी मागणी कोपर्डे हवेली गटाचे जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांनी केली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी गरज भासल्यास जिल्हा परिषदेची विशेष सभा घेण्याची मागणीही  त्यांनी संजीवराजे नाईक - निंबाळकर यांच्याकडे केली आहे.

बुधवारी 28 हजारांची मदत जमा...

चाफळ परिसरातील रोहन तोडकर याच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन कराड तालुका सकल मराठा समाज बांधवांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत गुरूवारी राजस्थानी जैन संघाने 11 हजार, गुजराथी संघाने 2 हजार तर उदयसिंह पाटील मित्रमंडळाकडून 15 हजारांची मदत बुधवारी मराठा भगिनींच्या हवाली करण्यात आली. ही सर्व मदत लवकरच तोडकर कुटुंबियांना देण्यात येणार आहे.