Tue, Jun 18, 2019 20:32होमपेज › Satara › मराठा अक्राळविक्राळ

मराठा अक्राळविक्राळ

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 25 2018 11:05PMसातारा : प्रतिनिधी

राजधानी सातार्‍यात निघालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाने बुधवारी अक्राळविक्राळ रूप धारण केल्याने  पुन्हा एकदा अक्षरश: मराठ्यांचा जनसैलाबच उसळला. अत्यंत त्वेषाने सहभागी झालेल्या मराठा तरुणाईने हे आंदोलन हातात घेतल्याने ठोक मोर्चाला आक्रमक स्वरूप आले. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा गगनभेदी घोषणा देत हजारोंच्या संख्येने मराठ्यांचे हे वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले तेव्हा अवघा परिसर मराठामय झाला. 

मराठा आरक्षण या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने राज्यभर तब्बल 58 मूक महामोर्चे काढण्यात आले; पण या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने ठोस निर्णय न घेता समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे पेटून उठलेल्या मराठा समाजाने ठोक मोर्चाचे दुसरे पर्व सुरू केले. बुधवारी राजधानी सातार्‍यात मराठा समाजाने अक्राळविक्राळ रूप धारण केले.  गांधी मैदानावर सकाळी 8 वाजल्यापासूनच मराठ्यांचे वादळ घोंघावू लागले होते. मोर्चाची सुरुवात तेथूनच होणार असल्याने मराठा बांधव गांधी मैदानावर दाखल होऊ लागले होते. नियोजित वेळ जवळ येईल तशी गर्दी वाढत चालली होती. मराठा युवकांचे जथ्थेच्या जथ्थे गांधी मैदानावर हजर झाले होते. अनेकांनी तर भगवे ध्वज लावलेली वाहने घेऊन गांधी मैदान गाठले होते.  बघताबघता गांधी मैदानासह मोती चौकापर्यंत मराठ्यांची तोबा गर्दी उसळली. प्रारंभी मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करण्यात आले. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या मावळ्याला श्रद्धांजली अर्पण करून मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समन्वय समितीच्या सर्वच पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ठोक मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला. पुढे मराठा भगिनी, मोर्चेकरी अन् पाठमागे दुचाकी, चारचाकी वाहनांची रॅली असा हा माहोल राजपथावरून पुढे पुढे सरकत गेला. 

‘एक मराठा लाख मराठा, एकदाच घुसणार भगवा दिसणार, जय शिवाजी जय भवानी, आरक्षण आमच्या हाकाचे नाही कोणाच्या बापाचे, तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण द्या नाहीतर खुर्ची खाली करा’ आदी  घोषणांनी मोर्चा  परिसर दणाणून गेला.  हा मोर्चा मोती चौक-देवी चौक-कमानी हौद चौक-शाहू चौक मार्गे पोवई नाक्यावर आला. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समाजबांधवांनी अभिवादन केले. पुढे हा मोर्चा जिल्हााधिकारी कार्यालयावर आला.

जिल्ह्यातून बरेच आंदोलक याठिकाणी सकाळी लवकर दाखल झाले  होते. या ठिकाणी मराठ्यांचा अक्षरशः जनसागर उसळला. यावेळी मराठा समाजातील बांधवांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दरम्यान,  प्रशासनाने  कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली होती. त्यासाठी मोर्चा मार्गावरील चौकां-चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हााधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलकांसाठी पोलिसांनी बॅरिगेटस लावली होती. राजवाडा येथून सुरू झालेल्या मोर्चात सुमारे 25 हजारावर मराठा समाजबांधव सहभागी झाले आहेत.