Wed, Jun 26, 2019 17:36होमपेज › Satara › अवघा जिल्हा स्तब्ध; बंद कडकडीत

अवघा जिल्हा स्तब्ध; बंद कडकडीत

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 25 2018 10:57PMसातारा : प्रतिनिधी

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या अनुषंगाने बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे अवघा जिल्हा स्तब्ध झाला.  जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत व उत्स्फूर्त बंद झाला. राजधानी सातार्‍यासह जिल्ह्यातील प्रमुख शहरे, उपनगरे व ग्रामीण भागात दिवसभर शुकशुकाट राहिला. बाजारपेठा, एस. टी. सेवा, वडाप, रिक्षा वाहतूक, शाळा- महाविद्यालये पूर्णपणे बंद राहिल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. व्यापारी, व्यवसायिक व छोटे-मोठे विक्रेतेही या 
बंदमध्ये सहभागी झाले होते. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या माहोलात जिल्ह्यातील अवघे वातावरण हरवून गेले. 

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. राजधानी सातार्‍यात या बंदला उत्स्फूर्त व कडकडीत प्रतिसाद मिळाला. सातारा शहर व उपनगरांमध्ये सकाळपासूनच तणावपूर्ण शांतता जाणवत होती.  सकाळी 7 वाजल्यापासून शहर व  परिसरातील  सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. शहरातील पोवई नाका, राजवाडा, बसस्थानक परिसर, करंजे पेठ, राधिका रोड, खालचा रस्ता, मोती चौक, विसावा नाका, गोडोली, शिवराज चौक येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट जाणवत होता. नेहमी गजबजूून जाणार्‍या ठिकाणी चिटपाखरूही फिरकत नव्हते. त्यामुळे जणूकाही अघोषित संचारबंदी असल्यासारखे वातावरण शहरात निर्माण झाले होते. ऐतिहासिक गांधी मैदानावरून सकाळी 10 वाजता ठोक मोर्चा काढण्यात आला. 

उपनगरातील कोडोली, संभाजीनगर, विलासपूर, प्रतापसिंहनगर, कृष्णानगर, संगम माहुली या भागातील रस्ते ओस पडले होते. महामार्ग आंदोलकांनी रोखल्यामुळे महामार्गावरील एका लेनची वाहतूक ठप्प झाली होती. तसेच आनेवाडी येथील टोलनाका मोकळा मोकळा वाटत होता. तालुक्याच्या ग्रामीण भागातही मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने गावगाडाही ठप्प झाला होता. 

खंडाळा :  खंडाळा तालुक्यात  लोणंदसह सर्वत्र  बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापारी, व्यवसायिक व विविध कार्यालये बंद ठेवून 100 टक्के बंद यशस्वी करण्यात आला. यावेळी एक महिन्याच्या आत मराठा आरक्षणाबाबत सरकारने उचित कार्यवाही न केल्यास मराठा समाज हातात दांडकी घेवून रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा खंडाळा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला.

वाई : वाई तालुक्यात  दुसर्‍या दिवशीही ठिकठिकाणी बंद यशस्वी झाला. भुईंज व पाचवड परिसरातील मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला होता. भुईंज येथील उड्डाणपुलाखाली स्व. काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहून सेवा रस्त्याने फेरी काढण्यात आली. तर पाचवड येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांनी महामार्ग रोखून घोषणाबाजी केली. तब्बल अर्धा तास महामार्गावरून वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. 

खटाव : बंदला खटावमध्ये 100 टक्के प्रतिसाद मिळाला. बुधवारी सकाळी 9 वाजता खटावमधील छ. शिवाजी चौकातून मराठा समाजाने मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून  सरकारच्या आरक्षणविरोधी भूमिकेचा निषेध केला. औंधमध्ये बाजारपेठा बंद ठेवून मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. त्याचबरोबर युवकांनी गावातून दुचाकी रॅलीही काढण्यात आली होती. वडूज-कराड रस्त्यावर उबडे येथे टायर जाळून वाहतूक रोखली होती. 
यावेळी फडणवीस सरकारचा निषेध करत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्रत एका ही मंत्र्यांला फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. याचबरोबर मायणीतही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर तालुक्यात बंदला व्यापक प्रतिसाद मिळाला.  पाचगणीत ठोक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांनी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी केली. मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलिस प्रशासनाला देण्यात आले. 

सातारकरांचा बेंदूर घरातच

मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. बुधवारीच शेतकर्‍यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या बैलाचा सण म्हणजेच महाराष्ट्रीयन बेंदूर आल्याने नागरिकांची गोची झाली. या दिवशी शहरातूनही बैलांच्या मिरवणूकी काढण्यात येतात. तर विविध वस्तू खरेदींसाठी बाजारपेठेत गर्दी होते. मात्र, जिल्हा बंदमुळे सातारा शहरासह ग्रामीण भागातील दुकाने बंद असल्याने सर्व खरेदी ठप्प पडली होती. सातारकरांना तर पुजन करण्यासाठी बैलांच्या प्रतिकृतीच मिळाल्या नाहीत. तसेच दुपारनंतर वातावरण आणखी चिघळत गेल्याने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे यंदाचा बेंदूर सातारकरांना घरातच साजरा करण्याची वेळ आली.

अत्यावश्यक सेवा अन् कॅफे सुरू

जिल्हाभर बंद पुकारण्यात आला असला तरी जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा देणारी मेडिकल्स, हॉस्पिटल आणि मेडिकल सीईटी परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याची आजची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून इंटरनेट कॅफे सुरू ठेवण्यात आली होती.

संतापातही माणुसकीचे दर्शन...

बॉम्बे रेस्टॉरंट येथे रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी मराठा बांधवावर लाठी चार्ज केला. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. मात्र, तरीही मराठा युवकांनी माणुसकीचे दर्शन घडवले. या दरम्यान दोन वेळा रुग्णवाहिका आणि एकदा अंत्यसंस्कार वाहन आल्याने आंदोलनकर्त्यांनी रस्ता मोकळा करून दिला.

सातारा आगारातील 250 फेर्‍या रद्द

मराठा आरक्षण या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली. यामुळे शहरातील एस. टी, वडाप, रिक्षा, जीपची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. एस. टी. चे नुकसान होऊ नये म्हणून दिवसभर शेकडो एस. टी आगारातच उभ्या होत्या. बुधवारी दिवसभरात 250 एस. टींच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे महामंडळाला लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. यामध्ये सातारा आगारातील 200 फेर्‍या, मुंबईच्या 20 तर पुण्याच्या 30 अशा एकूण 250 फेर्‍यांचा समावेश आहे. बुधवारी बेंदूर सणही असल्याने ग्रामीण भागातील जनतेचे हाल झाले. याचबरोबर आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलेल्या वारकर्‍यांना माण आगारातून एस. टी. न भेटल्याने पंचाईत झाली.