Wed, Apr 24, 2019 22:22होमपेज › Satara › मराठा आक्रमक; राज्यमार्गावर जाळपोळ

मराठा आक्रमक; राज्यमार्गावर जाळपोळ

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 25 2018 10:30PMकराड/उंडाळे : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला कराड तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. सुपने, तांबवे, उंडाळे, शेणोली, मलकापूरसह तालुक्यातील विविध भागात बंदमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले.

कराड तालुका मराठा समाज बांधवांनी मंगळवारी कराड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी बुधवारी महाराष्ट्र बंदमध्ये शांततेत व स्वयंशिस्तीचे दर्शन घडवत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून ग्रामीण भागात अपेक्षेप्र्रमाणे बंदचे पडसाद दिसू लागले. शेतकर्‍यांसह ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होत व्यवहार ठप्प ठेवल्याचे तांबवे, उंडाळे, शेणोली, मसूरसह तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत होते.

तांबवे परिसरात व्यवहार ठप्प

तांबवे येथे मराठा समाज बांधवांनी सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेऊन राज्य शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला. तांबवेसह परिसरातून दररोज येणार्‍या रिक्षा, अ‍ॅपरिक्षा, जीप यासह खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. अगोदरच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंळाच्या कराड आगारातील एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. तसेच तांबवे फाटा परिसरात साकुर्डी, तांबवेतील व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळल्याने कराड - चिपळूण मार्गानजीक स्मशान शांतता पसरल्याचे पहावयास मिळत होती.

कराड-चिपळूण मार्ग विस्कळीत

तांबवे फाटा परिसरात व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला असतानाच सुपने, आबईनगर आणि वसंतगड येथील युवकांनी आक्रमक पवित्रा घेत कराड - चिपळूण मार्गावर ठिय्या मारला होता. आबईनगर येथे युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहनचालकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तर वसंतगडमध्ये पोलिसांच्या उपस्थितीतच कराड - चिपळूण मार्गावर ठिय्या मारत मराठा युवकांनी जोरदार निदर्शने केली. त्यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
कराड - चांदोली मार्गावर ठिय्या

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गासह  कराड - चांदोली मार्गावर पाचवड फाटा ते येळगाव या दरम्यानच्या सुमारे 20 किलोमीटरच्या अंतरावर वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. उंडाळेसह परिसरातील युवकांनी बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास कराड - चांदोली मार्गावरील उंडाळे गावातील मुख्य चौकात आरक्षणासाठी नदीत उडी घेत आत्महत्या केलेल्या काकासाहेब शिंदे - पाटील आणि विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या जगन्‍नाथ सोनवणे यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. त्यानंतर सकाळी 9 वाजता जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. तसेच खासगी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन यावेळी युवकांनी केले.

दरम्यान, येळगाव परिसरात कराड - चांदोली मार्गावर मराठा समाज बांधवांनी ठिय्या मारत सुमारे अर्धा ते एक तास या मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात जाणार्‍या लोकांना मोठा फटका बसला. उंडाळे परिसरातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.