Tue, Apr 23, 2019 10:24होमपेज › Satara › मराठा क्रांती मोर्चातर्फे आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन

मराठा क्रांती मोर्चातर्फे आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 11:38PMसातारा : प्रतिनिधी

मराठा समाजाने 58 मोर्चे काढूनही आरक्षणाला शासनाने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले असतानाच नवीन नोकर भरतीचा घाट घातल्याने मराठ्यांची खदखद उफाळूल आली आहे. आता मराठ्यांचा संयम सुटला असून  आरक्षण जाहिर न केल्यास होणार्‍या परिणामाची  जबाबदारी शासनावर राहिल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांंनी दिला. दरम्यान  इयत्ता 11 वी, 12 वीच्या सर्वसाधारण शालेय प्रवेशात शासनाने सवलत न दिल्याने मराठ्यांच्यावर अन्याय होत आहे. याबाबत योग्य तो निर्णय 15 ऑगस्टपूर्वी न झाल्यास पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या  ठिकाणी व सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दि. 20  पासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 

कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यात मराठा क्रांती मोर्चाने 58 मोर्चे काढले. मराठा मोर्चातील एकही मागणी शासनाने मान्य केली नाही. मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी शासनाने याच अधिवेशनात विनाविलंब जाहिर करावी. उलट विविध विभागातील 36 हजार नोकर भरतीचा घाट घातला आहे. या नोकर भरतीत मराठा बांधवांना 2 ते 3 हजार जागाच पदरात पडणार आहेत. यासाठी जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत नोकर भरतीला स्थगिती द्यावी. बिंदु नामावली नोंद वहित बेकायदेशीर खुल्या प्रवर्गातील जागा अतिरिक्त केल्या आहेत. त्यामध्ये दुरूस्ती करेपर्यंत कोणतीच नोकर भरती करण्यात येवू नये. या नोकर भरतीपूर्वी सर्वसाधारण संवर्गातील शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांना पदोन्नती दिल्यास ज्या जागा रिक्त होतील, त्या जागांवर नवीन नोकर भरती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शासनाने उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहिर करताना जुनी 11 वी, 12 वीमधील प्रवेश फी अन्य समाज बांधवांना 50 रूपये आकारली आहे. मात्र हिच फी मराठी समाजातील मुलांना 360 व 390 रूपये अशी आकारली आहे.  विद्यार्थीदशेपासून जातीय बिज पेरण्याचे काम शासनाकडून केले जात आहे, असा आरोपही या पत्रकात करण्यात आला आहे. 

या फी संदर्भात मराठा क्रांती मोर्चा लवकरच मोर्चाचे आयोजन करणार आहे. 15 ऑगस्टपूर्वी या संदर्भात शासनाने याच अधिवेशनात अध्यादेश काढून राज्यात प्रवेशासाठी  मराठा समाज बांधवांची होणारी कोट्यवधी रूपयांची लुट थांबवली नाहीतर पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यात येईल, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असून याठिकाणी मराठा बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी शरद काटकर, पंचायत समिती सदस्य संजय पाटील, शरद जाधव, संदिप पोळ, वैभव शिंदे, शिवाजी काटकर, अ‍ॅड. उदय शिर्के, नितीन शिंदे, प्रशांत नलवडे, विशाल महाडीक, कृष्णा घोरपडे, दत्ता घोरपडे, सौ. जयश्री शेलार, अ‍ॅड. सौ. फडतरे आदी मराठा बांधव उपस्थित होते.