Mon, Apr 22, 2019 16:12होमपेज › Satara › महामार्ग रोखला; बसही फोडल्या

महामार्ग रोखला; बसही फोडल्या

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 12:08AMसातारा : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाला सातार्‍यात सोमवार रात्रीपासून हिंसक वळण लागले असून, वाढे फाटा व विलासपूर येथे शिवशाही व खासगी बस फोडण्यात आल्या. मंगळवारी वाढे फाटा येथे आंदोलकांनी महामार्ग रोखला. वाई, फलटण, कोरेगाव, खटाव, माण या तालुक्यांमध्येही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला, तर काही ठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आला.  दरम्यान, हे आंदोलन चिघळल्याने जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी एका आंदोलकाने औरंगाबाद जिल्ह्यात जलसमाधी घेतल्यानंतर त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सोमवारी रात्री सातार्‍यात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिवशाही बस (क्रमांक एमएच 03 सीपी 5217) सातारकडे येत होती. ही बस वाढे फाटा ते जुना आरटीओ चौक येथे आल्यानंतर पेट्रोलपंपाजवळ अज्ञातांनी त्यावर दगडफेक केली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबवली. या घटनेत एसटीची काच फुटून 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी शिवशाहीचा बस चालक विजय आनंदराव जाधव (रा.ल्हासुर्णे, कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.सोमवारी रात्री आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मंगळवारी दिवसभरही त्याचे पडसाद उमटले. मंगळवारी दुपारी विलासपूर येथे एक ट्रॅव्हल्स (एम.एच.04 जी.पी. 9686) उभी असताना त्यावरही आंदोलकांनी दगडफेक केली. 

दरम्यान, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वाढे फाटा येथे शेकडो मराठा समाजातील बांधव एकत्र जमले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोलिस बंदोबस्त वाढवला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखला. सुमारे 15 मिनिटे आंदोलक महामार्गावर बसून राहिल्याने वाहतूक क्षणात ठप्प झाली. मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करुन तत्काळ आरक्षण देण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड करुन पोलिस व्हॅनमध्ये घातले. आंदोलनकर्त्यांना पोलिस ठाण्यात आणले. 

सातारा जिल्ह्यात बंद  बुधवारी होत असला तरी मंगळवारी जिल्ह्यातील वाई, कोरेगाव, फलटण, माण, खटाव या तालुक्यात उत्स्फूर्तपणे नागरिकांनी बंद पाळला. मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठिकठिकाणी रस्ता रोको, ठिय्या आंदोलनेही झाली. मराठा क्रांती मोर्चा सातारा जिल्ह्याच्या समन्वय समितीने बुधवारी जिल्हा बंद पुकारला असला तरी मंगळवारीच बंदचे लोण वाई, कोरेगाव, फलटण, माण, खटाव या तालुक्यात पसरले.