Mon, May 27, 2019 09:04होमपेज › Satara › मराठ्यांचे आंदोलन भडकले

मराठ्यांचे आंदोलन भडकले

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 25 2018 10:51PMकराड : प्रतिनिधी

मराठा आरक्षण मागणीसाठी बुधवारी पुकारण्यात आलेल्या सातारा जिल्हा बंदला कराड, पाटण तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला. कराड, उंब्रज व वहागाव येथे आंदोलकांनी महामार्गावर ठाण मांडून काही काळ वाहतूक रोखली. मसूर, ओगलेवाडी, कार्वे येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले. तर तारळे येथे सरकार विरोधी निषेध मोर्चा काढण्यात आला. ओगलेवाडी येथे मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंतयात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. कराड शहरातील हॉटेल अलंकारवर संतप्त आंदोलकांनी दगडफेक केली. भाजी मंडई परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. बंद काळात शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. 

उंब्रजमध्ये कडकडीत बंद

उंब्रज : प्रतिनिधी

आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडत मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन कर्त्यानी उंब्रज येथे  सरकार विरोधी घोषणा देत  काही काळ राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.  सरकारचा निषेध  नोंदविला. दरम्यान उंब्रज येथे व्यावसायिक बंदमध्ये उत्स्फूर्त सहभागी झाल्याने  उंब्रजसह परिसरात शुकशुकाट होता.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनासाठी उंब्रज ता. कराड येथील सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान दिलेले काकासाहेब शिंदे व जगन्नाथ सोनावणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

उंब्रज  येथील बाजारपेठेतील छ. शिवाजी महाराज पुतळ्यानजीक सकल मराठा समाजाने सकाळी  एकत्रित येत छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आंदोलकांनी मनोगत व्यक्त करत सरकार विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.  गावातून फेरी काढण्यात आली. यावेळी ’एक मराठा लाख मराठा ’, ’आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. याच दरम्यान बसस्थानक परिसरात सकल मराठा बांधवांनी महामार्ग काही काळ रोखून धरून सरकार विरोधात घोषणा बाजी केली. बंद मधून मेडिकल, दवाखाने यांना वगळण्यात आले होते. मराठा क्रांती ठोक मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उंब्रज पोलिस प्रशासनाने मसूर फाटा, इंदोली फाटा, बसस्थानक परिसर, बाजारपेठ येथे प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  संपूर्ण परिस्थितीवर सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप भोसले व  पोलिस उपनिरीक्षक रवी शिंदे तसेच पोलिस कर्मचारी नियंत्रण ठेवून होते. दरम्यान इंदोली फाटा येथे दुपारी इंदोलीसह परिसरातील मराठा बांधवानी महामार्गावर आंदोलन करून सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला. 

तारळेत सरकार विरोधी निषेध रॅली 
तारळे : वार्ताहर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुकारलेल्या तारळे बंदला व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त पाठिंबा दिला.  बंद शांततेत पार पडला. गावातून रॅली काढून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे यांना आदरांजली वाहून आंदोलनाची सांगता झाली. 

अनेक सामाजिक संंघटनांनी मोर्चात सामिल होत पाठींबा व्यक्त केला. यावेळी चौकात टायर पेटवून देण्यात आले. सकाळी दहाच्या दरम्यान बसस्थानक चौकात तारळेसह विभागातील मराठा बांधव एकत्र  आले. त्यानंतर एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत रॅलीला सुरुवात झाली. भैरवनाथ मंदिर, बाजारपेठ, ग्रामपंचायत कार्यालय, हनुमान पेठ, आंबा चौक, तारळे घोट रस्ता मार्गे मोर्चा तारळे बसस्थानक चौकात घोषणा देत पोहचला. त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चाला पाठींबा व्यक्त केला. 

सकाळपासूनच अत्यावशक सेवा वगळता व्यापार्‍यांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली. त्यामुळे आंबा चौक,बसस्थानक चौक, बाजारपेठ हा गजबजलेला परिसर ओस पडाला होता. एसटीच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. 

बंदमुळे गावागावात शुकशुकाट

मारूल हवेली  : वार्ताहर

मराठा आरक्षण प्रमुख मागणीसाठी सकल मराठा बांधवांकडून पुकारलेल्या सातारा जिल्हा बंदला कराड-पाटण राज्यमार्गावरील गावासह तालुक्यातील अन्य गावांनी बंद पाळून उत्स्फूर्त पाठिंबा दिला. कराड - पाटण राज्यमार्गावरील सुपने, वसंतगड, साकुर्डी पेठ, निसरे फाटा याठिकाणी कडकडीत बंद पाळून व्यापारी वर्गासह नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला.  ठिकठिकाणी दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट  होता. सुपने येथे मराठा तरूणांनी एकत्र येऊन  राज्यमार्गावर सुरू असलेली वाहतूक काही काळ अडवली. तांबवे येथे बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवून व्यापार्‍यांनी पाठिंबा दिला. म्होप्रे व उत्तर तांबवे येथे तरूणांनी रस्त्यावर टायर पेटवून सरकारचा निषेध केला.

बंदमुळे मल्हारपेठ विभागातील गावागावात शांतता होती. तर नागरिकांमध्ये मराठा आंदोलनाच्या चर्चा सुरू होत्या. व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक, वाहतूकदारांनी पाठिंबा दिल्याने विभागात शुकशुकाट होता. कराड - पाटण राज्यमार्गावर तुरकळ प्रमाणात वाहतूक सुरू होती. इतर ठिकाणचे रस्ते ओस पडले होते. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जागोजागी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मल्हारपेठ व नवारस्ता येथे मंगळवारी कडकडीत बंद पाळल्याने बुधवारी नेहमीप्रमाणे येथील जनजीवन सुरळीत सुरू होते. मात्र बंदमुळे मल्हारपेठ येथील आठवडी बाजाराला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाला.