Thu, Apr 25, 2019 06:12होमपेज › Satara › दंगलीत मोक्‍का-तडिपारीतील पिलावळ

दंगलीत मोक्‍का-तडिपारीतील पिलावळ

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 10:58PMसातारा : प्रतिनिधी

मराठा क्रांती ठोक मोर्चानंतर झालेल्या तोडफोड, जाळपोळ व दगडफेकीमध्ये सहभागी असलेल्यांचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.  पोलिसांकडून संशयितांच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ शूटिंगचा आधार घेतला जात आहे. शुक्रवारी पोलिसांनी केेलेल्या तपासणीत आणखी 20 जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा मोर्चाला गालबोट लावण्यासाठी ज्यांच्याकडून ही दंगल घडवण्यात आली त्यात मोक्‍का, तडिपारीतील  संशयितांची पिलावळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची गुरुवारी रात्री पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

मराठा ठोक मोर्चानंतर महामार्गावर तुफान दगडफेक करून दंगल घडवल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. बुधवारी दुपारी झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर पोलिसांनी 55 जणांना अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सातारा व कोल्हापूर येथील कळंब कारागृहात जागा नसल्याने संशयितांची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.दरम्यान, गुरुवारी दिवसभरात पोलिसांनी केलेल्या व्हिडीओ शूटिंग व कॅमेर्‍यांतून घेतलेल्या फोटोंच्या आधारे मोर्चानंतर दंगा करणार्‍यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. 

त्यानुसार मंगेश जगताप, संजय पवार, मंगेश ढाणे, मल्‍लेश मुलगे, सचिन कोळपे, सचिन खोपडे, संदीप नवघणे, सचिन कदम, समीर शेख, लक्ष्मण खर्डे यांच्यासह सुमारे 20 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी चार्ज स्वीकारल्यानंतर सराईत गुन्हेगारांना मोक्‍का लावण्याचे काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत 100 हून अधिक जणांना मोक्‍का लावला आहे. 

मराठा क्रांती ठोक मोर्चावेळीच तोडफोड, जाळपोळ व दगडफेक करून  दंगल करण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न होता. यामध्ये ते यशस्वीही झाले. या घटनेत 32 पोलिस जखमी झाले तर 25 लाख रूपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. या दंगलीत ज्या गुन्हेगारांना मोक्‍का लागला आहे त्यांचीच पिलावळ या दंगलीत सक्रीय होती. पोलिसांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.  पोलिसांवरच हल्‍ला केल्याने पोलिसांनीही संशयित धरपकड करण्यास सुरूवात केली आहे. 

संशयितांची उचलबांगडी करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झालेली आहेत. बुधवारी झालेल्या दगडफेकीनंतर अनेकांनी शहरातून, जिल्ह्यातून पळ काढलेला आहे. गुरुवारी दिवसभरात एकाच संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

महामार्गावरील तोडफोड प्रकरणात एका तडीपारीतील संशयिताचा सहभाग असल्याचे शहर पोलिस निष्कर्षापर्यंत आले आहेत. याशिवाय संशयितांमधील अनेकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यामुळे दंगल करणार्‍यांच्या मागावर पोलिस आहेत. पोलिस तपास योग्यप्रकारे व्हावा यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आलेली आहेत. त्यानुसार पथके कारवाई करत आहेत.बुधवारी झालेल्या घटनेमध्ये समाजकंटकांबरेाबर पोलिसांनी मराठा आंदोलकांवरही लाठीचार्ज केला. पोलिसांचा लाठीचार्ज आणि दगडफेकीत बरेच मराठा आंदोलकही जखमी झाले आहेत. पोलिसांच्या रपाट्यामुळे अनेकांना बेडवर पडावे लागले आहे. तर अनेकांना फ्रॅक्‍चर झाल्याने दवाखान्याच्या चक्‍कर सुरू झाल्या आहेत. 

दरम्यान, बुधवारी झालेल्या तुफान दगडफेकीमध्ये पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह 32 जण जखमी झालेले आहेत. यामध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाल्याने अद्याप त्यांच्यावर उपचार सुरुच आहेत. अनेकांचे हात, पाय, तोंड सुजलेले असून वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना आराम करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे जखमी पोलिसांनी सुट्टी घेण्यासाठी रांग लावलेली आहे.