Thu, Jun 27, 2019 09:39होमपेज › Satara › मराठा, धनगर समाजांनी आरक्षणासाठी केंद्रावर दबाव आणावा : ना. रामराजे

मराठा, धनगर समाजांनी आरक्षणासाठी केंद्रावर दबाव आणावा : ना. रामराजे

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 11:27PMफलटण : प्रतिनिधी 

मराठा समाज असो किंवा धनगर समाज असो, मुलांच्या शिक्षण व नोकरीसाठी आरक्षण मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे. यासाठी आपण स्वतः तुमचे नेतृत्व करायला तयार असून हे आरक्षण मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार आपल्या सर्वांच्या पाठीशी राहणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

फलटण येथील चौकाच्या नामकरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  ते म्हणाले, मराठा समाजाने लाखोंच्या समुदायाने महाराष्ट्रभर मोर्चेकाढले तसेच धनगर समाज गेली कित्येक वर्षे धनगर का धनगड मुळे पेचात सापडला आहे. मात्र,  आता खा.शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एकत्र येऊन हे दिल्लीचे तख्त उखडून टाकूया.

मराठा व धनगर समाजाच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज असून यापुढे समाजाने राजकीय आरक्षण मागण्यापेक्षा या तरुण मुलांच्या भविष्यासाठी शिक्षण व नोकरीसाठी आरक्षण मागणे गरजेचे आहे. आजचे अनेक नेते आपला राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी समाजाला कोंडीत पकडण्यासाठी काम करीत आहेत. समाजातील व्यक्ती आमदार किंवा खासदार व मंत्री असेल तरच आरक्षण मिळेल ही भावना सोडून द्या, फक्त एका जातीवर निवडणूका जिंकता येत नाहीत. यासाठी आरक्षणाची धार वाढवायची असल्यास सर्वांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवा. दिल्लीमध्ये आपले वर्चस्व वाढल्यास दिल्लीकरांना आपल्या पुढे झुकावे लागून मराठा व धनगर समाजातील लोकांना आरक्षण मिळेल, असे ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी  स्त्री असूनही या महाराष्ट्रात चांगले काम केले. फक्त त्यांच्या नावाचा फलक लावून चालणार नाही तर त्यांचे स्मारक उभे करुन त्यांच्या इतिहासाला उजाळा मिळण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. 

मी जरी धनगर समाजात जन्मलो नसलो तरी या समाजाचे माझ्यावर प्रचंड उपकार आहेत. यामुळे समाजाचा     प्रतिनिधी असावा हा हट्ट सोडून द्या व मिळेल ते पदरात पाडून घ्या, असा सल्लाही ना. रामराजे यांनी दिला.

यावेळी आ.दीपक चव्हाण, उत्तमराव जाणकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सभापती सौ.रेश्माताई भोसले, अभिजीत देवकाते, बजरंग गावडे, मिलिंद नेवसे व सर्व नगरसेवक, धनगरबांधव उपस्थित होते. 

प्रास्तविक नगराध्यक्षा सौ.निता नेवसे यांनी केले. आभार भीमदेव बुरुंगले यांनी मानले .ना. रामराजे नाईक निंबाळकर यांना धनगर समाजाच्या वतीने ढोल, पगडी, घोंगडी व फेटा बांधून ढोल गळ्यात घातला व सर्वांनी आमच्या आरक्षणासाठी आता तुम्हीच प्रयत्न करावेत, अशी एकमुखी  मागणी त्यांनी केली.

मला चिडवले की मी कोणाला सोडत नाही

भाषण सुरु असतानाच रामराजेंनी त्यांच्या भाषणात, ‘मला चिडवले की मी कोणाला सोडत नाही’, असे म्हणत खा.उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.