Fri, Jun 05, 2020 02:09होमपेज › Satara › भीमा-कोरेगाव दंगलीचे सूत्रधार मनोहर भिडेंना अटक करा 

भीमा-कोरेगाव दंगलीचे सूत्रधार मनोहर भिडेंना अटक करा 

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 10:18PMकराड : प्रतिनिधी 

भीमा-कोरेगाव दंगलीचे मुख्य सूत्रधार मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना अटक करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील बहूजन समाजास एकत्र करून बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने परिवर्तन यात्रा राज्यभर काढण्यात येत आहे. ही यात्रा दि. 28 व 29 मे रोजी सातारा जिल्ह्यात येत असल्याची माहिती बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य संयोजक कुमार काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील व केंद्रातील सरकार बहूजन समाजावर अन्याय, अत्याचार करून सत्तेचा गैरवापर करून त्यांना वेठीस धरत आहे. या अन्याया विरोधात जनजागृती करत राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या बहूजन क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित परिवर्तन यात्रेचा उद्देश कुमार काळे यांची  स्पष्ट केला. यावेळी राज्य मानवाधिकार कल्याणकारी संघटनेचे कार्याध्यक्ष निसार मुल्ला, बहूजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक आनंदराव लादे, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय काटरे, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या निशा मुनेश्‍वर आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले, भीमा-कोरेगावची दंगल हा राज्य सरकारचा पूर्वनियोजित कट होता. यातील मुख्य आरोपी मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांच्यासह अनेकांना राज्य सरकार क्लिन चीट देत आहे. चौकशी होण्याआधीच त्यांना अभय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. उलट त्यांच्या नावाची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी शिफारस करून राज्य सरकार त्यांच्या समाजविघातक कृत्यांचे अप्रत्यक्ष समर्थन करत आहे. 

बहूजन सामाजाला जागृत करून प्रस्थापितांविरोधात संघर्ष करण्यासाठी वामन मेश्राम यांच्या नेतृत्वखाली बहुजन क्रांती मोर्चा काम करत आहे. 24 एप्रिल रोजी नागपूर येथे या परिवर्तन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही यात्रा 3 जूनपर्यंत राज्यभर फिरून 110 ठिकाणी सभा घेणार आहे. यात्रेचा समारोप 3 जून रोजी पुणे येथे अभिवादन महारॅलीने करण्यात येणार आहे. 28 व 29 मे रोजी ही यात्रा सातारा जिल्ह्यात येणार आहे. ही यात्रा तासगाव येथून शेणोली-कराड-मसूर-उंब्रज-सातारा-कोरेगाव-वर्धनगड-कटगूण-वडूज-दहिवडी-फलटण अशी जाणार आहे. 28 मे रोजी दुपारी एक वाजता कराड येथे, सायंकाळी 6 वाजता सातारा येथे, तर 29 रोजी सकाळी 10 वाजता कटगूण येथे, दुपारी एक वाजता दहिवडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भिडे, एकबोटेंना फाशी झाली पाहिजे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक  करण्यात यावा, मराठा, धनगर, मुस्लिम यांना आरक्षण देण्यात यावे, लिंगायत धार्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात यावा, शेती मालाला हमीभाव आदी मागण्या या परिवर्तन यात्रेदरम्यान करण्यात येत आहेत. 

शहरात संभाजी महाराजांचा पुतळा उभारणार..

कराड शहरात स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात येत आहे. येथील कृष्णा नाक्यावरील सर्कलमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी बहूजन क्रांती मोर्चा आग्रही आहे, अशी माहिती निसार मुल्ला यांनी  दिली.