Wed, Jul 08, 2020 04:11होमपेज › Satara › मानिनी जत्रेस सातारकरांचा उदंड प्रतिसाद

मानिनी जत्रेस सातारकरांचा उदंड प्रतिसाद

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 10:49PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषद व ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मैदानावर आयोजित मानिनी जत्रेला सातारकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्याच्या विविध  भागातील खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळत असल्याने खवैय्यांची चांदी होत आहे. दरम्यान,  मानिनी जत्रेतील महिलांच्या  स्टॉल्सवर  चमचमीत थालीपीठ, छोले भटुरे,  खानदेशी मांडे, पुरणपोळी खाण्याचा आनंद खवैय्ये लुटत आहेत. 

मानिनी जत्रेत  राज्याच्या विभागातील  पदार्थांबरोबरच झकास गावरान कोंबडी, चिकन सिक्स्टी फाय, दम बिर्याणी, तांबडा-पांढरा रस्सा, बाजरीची भाकरी याचाही आनंद सातारकरांनी लुटला.

स्टॉलवरील चप्पल, पर्सेस, गारमेंट, गृहोपयोगी वस्तू हे सर्व एकाच ठिकाणी मिळात असल्याने खरेदीसाठी झुंबड उडत होती. स्वयंरोजगारातून समृध्दीकडे वाटचाल करत असलेल्या स्वयंसहायता बचतगटांना  मानिनी जत्रेमुळे बाजारपेठ उपलब्ध झाल्याने महिलांची  सक्षमतेकडे वाटचाल सुरु झाली आहे. सातारा, कराड, पाटण, वाई, माण, खटाव, फलटण, तालुक्यातील बचत गटांबरोबरच इंदोली, ता.बारामती, पुणे जिल्ह्यातील महिला बचत गटांनी मानिनी जत्रेत आपल्या उत्पदनांसह सहभाग घेतला आहे.

माणदेशच्या मातीत पिकलेले कडधान्य, कुरडया, पापड, लाकडी वस्तू,  विविध प्रकारची लोणची, मातीची स्वयंपाकाची भांडी, शोभेच्या वस्तूही सातारकरांचे आकर्षण ठरत आहेत. महिला उद्योजिकांनी बनवलेल्या सिरॅमिक नेम प्‍लेट, गणेश मूर्ती,  भिंतीवरील फ्रेम, अम्बॉस पेंटींग, इमिटेशन ज्वेलरी, रेडीमेड कपडे, विविध प्रकारच्या चटण्या, मसाले यांनाही ग्राहकांमधून पसंती दिली जात आहे. शनिवार, रविवार व नाताळची जोडून आलेल्या सुट्टीमुळे मानिनी जत्रेत नागरिकांची तुडुंब गर्दी होती.