Mon, May 20, 2019 08:44होमपेज › Satara › मांढरगडावर आई काळुबाईचा जागर

मांढरगडावर आई काळुबाईचा जागर

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 03 2018 1:18AM

बुकमार्क करा
मांढरदेव : वार्ताहर 

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळुबाई देवीच्या यात्रेस सोमवारपासून सुरुवात झाली असून, मंगळवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत शाकंभरी पौर्णिमेच्या मुख्य दिवशी सकाळी 6 वाजता मुख्य जिल्हा न्यायाधीश आर. एन. लड्डा यांच्या हस्ते देवीची सपत्नीक महापूजा करण्यात आली. ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने मांढरगड दुमदुमून गेला. लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. सोमवारपासूनच भाविक जीप, ट्रक, टेम्पो, बस इ. वाहनांतून देव देव्हार्‍यासह गडावर दाखल झाले आहेत. त्यामुळे दोन दिवस अगोदरच मांढरदेवगडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

यात्रेच्या पूर्वसंध्येला सोमवारी जागर असल्याने लाखो भाविकांनी     काळूबाईचे दर्शन घेतले. मंगळवार हा शाकंभरी पौर्णिमेचा (पौष पौर्णिमेचा) मुख्य दिवस असल्याने कडाक्याची थंडी असतानाही भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रात्रीपासून लांबच लांब रांगा लावल्या होत्या. शाकंभरी पौर्णिमेच्या मुख्य दिवशी सकाळी 6 वाजता मुख्य जिल्हा न्यायाधीश आर.एन. लड्डा यांच्या हस्ते देवीची सपत्नीक महापूजा करण्यात आली. पूजेनंतर दर्शनासाठी भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. महापूजेच्यावेळी रांगेतील प्रथम भाविक बाजीराव मारुती चौधरी व त्यांच्या पत्नी सुभद्रा बाजीराव चौधरी रा. किवळे, ता. खेड, जि. पुणे यांना पूजेचा मान मिळाला. पूजेवेळी तहसीलदार अतुल म्हेत्रे, देवस्थानचे ट्रस्टी चंद्रकांत मांढरे, राजगुरु कोचळे, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन.के. चव्हाण यांच्यासह लाखो भाविक उपस्थित होते. 

भाविकांना दर्शन सुलभरित्या व्हावे म्हणून बॅरीकेटस्ची उभारणी करण्यात आली आहे. कळस दर्शन मार्ग, छबिना किंवा देव्हारा मार्ग, चरणदर्शन मार्ग या वेगवेगळ्या रांगांमुळे भाविकांना चटकन दर्शन मिळत होते. काळूबाईचे दर्शन घेऊन भाविक सुखावत होते. पोलीस यंत्रणा सर्वत्र सज्ज असून बॅरिकेटस लावून भाविकांना शिस्तीने दर्शन घेण्यास सांगितले जात आहे. पशुहत्या, लिंबू, जादूटोणा आदी प्रकार टाळण्यासाठी काही कर्मचारी परिसरात लक्ष ठेवून आहेत. यासाठी विविध गट तयार करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीमार्फत भाविकांना सुविधा  पुरवल्या जात आहेत. भोर घाटाकडून येणार्‍या वाहनांची वर्दळ मोठी होती. कडाक्याच्या थंडीमुळे उबदार कपडे खरेदी करण्यासाठी भाविकांची झुंबड उडत आहे. देवीचा प्रसाद, खेळणी व इतर साहित्य खरेदी करुन भाविक काळूबाईच्या नावानं चांगभलंच्या गजरात परतीच्या प्रवासाला निघत आहेत. 

मांढरदेव येथे पशुहत्या करण्यास बंदी आहे. त्यामुळे भाविकांनी देवीला गोड नैवेद्य दाखवला. त्यासाठी त्यांनी जागोजागी चुली पेटवल्या होत्या. दर्शन घेऊन माघारी फिरणारे भाविक प्रसाद, फोटो, खेळणी, देवीच्या गाण्यांची सीडी खरेदी करत होते.