Fri, May 29, 2020 19:26होमपेज › Satara › काळूबाई मांढरदेव नवरात्रोत्सव विशेष

काळूबाई मांढरदेव नवरात्रोत्सव विशेष

Published On: Oct 16 2018 2:00AM | Last Updated: Oct 15 2018 8:51PMयशवंत कारंडे, वाई / - दीपक मांढरे, मांढरदेव

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मांढरदेव हे तिर्थक्षेत्र सह्याद्रीच्या  पर्वतरांगेत  वाई व भोरपासून सुमारे बावीस ते चोवीस किलोमीटर अंतरावर आहे. काळूबाईचे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 4700 फूट उंचीवर आहे. 

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत मांढरदेव हे गाव वाई व भोरपासून सुमारे 22 ते 24 किलोमीटर अंतरावर असून मांढरगडावरील आई काळूबाईचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मांढरगडावरील काळूबाई देवीचा महिमा अलौकिक आहे. अंदाजे 350 वर्षापूर्वीचे हेमांडपंथी बांधकाम असलेले पूर्वाभिमुखी मंदिर आहे. मंदिराचा अंतर गाभारा, गाभारा व सभामंडप असे तीन भाग आहेत. सभामंडपाचे बांधकाम 18 व्या शतकात झाले. 

काळेश्‍वरीची मूळ तीन रुपे आहेत. यामध्ये पहिले उग्ररुपी तामस कोलकत्ता, दुसरे सत्व रुप ते गुजरात येथील पावागड येथे तर तिसरे राजसरुप हे मांढरदेव येथे पहायला मिळते.घटस्थापना, ललित पंचमी, अष्टमी, नवमी व दसर्‍याला देवीच्या दर्शनासाठी यात्रेला महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून भाविक येतात. मंगळवार, शुक्रवार, रविवार, अमावस्या, पौर्णिमेला दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. 

देवीची माहिती व महती

या देवीचे मूळ नाव काळूबाई (काळेश्‍वरी) असून ती काळूआई, मांढरदेवी या नावाने ओळखली जाते. काळेश्‍वरी याचा अर्थ जी काळाची ईश्‍वर आहे ती किंवा काळाला नियंत्रित करणारी शक्ती ती काळेश्‍वरी. शैव व शाक्त पंथियांमध्ये या स्थानाला विशेष महत्व आहे. नवसाला पावणारी, कार्य सिद्धिस नेणारी, भक्तांवरील संकटात त्वरेने धावून येणारी अशी काळूबाईची ख्याती आहे. 

देवीची अनेक रुपे आहेत. आदिशक्ती, आदिमाता, तुळजाभवानी, कलेची शारदा, संपत्तीची लक्ष्मी, दुर्जनांचा संहार करणारी आदिशक्ती आदिमाता मांढरदेवची काळूआई, काळेश्‍वरी, काळूबाई, मांढरदेवी म्हणतात. ही देवी म्हणजे पार्वतीचे साक्षात कालिमातेचे रुप असे सांगितले जाते. 

देव व असूर संग्रामानंतर जे काही राक्षस उरले त्यांना देवीने युद्धामध्ये पराजित केले. पण महिषासूर व रक्तबीज हे राक्षस मात्र काही केल्या पराजित होत नव्हते. कारण त्यांना अभय होते. त्यांचे निर्दालन करावे म्हणून सर्व देव भगवतीकडे गेले. देवी व तिचे सर्व सैन्य शिवगण, दाक्षायणी, चंडिका युद्धास सज्ज झाली व घनघोर युद्ध झाले. अनेक राक्षस मारले गेले. शेवटी महिषासूर शरण आला. त्याला देवीने आपल्या पायाजवळ स्थान दिले व त्याचे खाद्य म्हणून अजाबली (बोकड बळी) घेण्यास त्याला परवानगी दिली. तेव्हापासून देवीला बळी न देता तो महिषासुराला दिला जातो व देवीला महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखले जाते. रक्तबीजाला मारण्यासाठी तिने अष्टायुधे धारण केली. आक्राळविक्राळ रुप धारण करुन त्याला ठार मारले. त्यानंतर देवीला शांत करण्यासाठी स्वत: शंकर देवीच्या मार्गात झोपले. गर्जना करत देवी फिरत असताना तिचा पाय शंकराला लागला आणि तिचे तेजपुंज शरीर काळवंडले म्हणून तिला काळूबाई, कालिका असे म्हणतात. त्यानंतर देवी श्रमपरिहारासाठी मांदार पर्वतावर म्हणजेच मांढरदेव डोंगरावर गेली. 

मांढरदेव परिसरात शिव, मारुती, भैरवनाथ, दत्त मंदिर, विठ्ठल, रुक्मिणी,गणपती आदी मंदिरे आहेत. तसेच गोंजिरबाबा, मांगिरबाबा, म्हसोबा या देवीच्या रक्षकांची मंदिरेही आहेत.  देवीचे मूळ मंदिर हेमांडपंथी असून अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधकाम केलेले पूर्वाभिमुखी आहे. मंदिरासमोरील दोन्ही दीपमाळा प्राचीन असून मुख्य दरवाज्याशी दगडी कासव आहे. सभामंडपात मध्यभागी देवीचे वाहन सिंह  असून तो संगमरवरी दगडात आहे. देवीची मूर्ती तांदळा स्वरुपात शेंदूरचर्चित आहे. 

त्यावर मुखवटा असून पोषाख चढवलेला आहे. देवीची पालखी चांदीची असून विशेष प्रसंगी व मिरवणुकीच्या वेळी देवीची छबिन्यासह मिरवणूक निघते. नवसाला पावणारी व  भक्तांचे कल्याण करणारी देवी म्हणून काळूबाई देवीची ख्याती आहे. देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह राज्य परराज्यातून भाविक येतात. नवरात्रोत्सवात देवीची वेगवेगळ्या रुपात पूजा बांधण्यात येते. नवरात्र कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी अहोरात्र उघडे असते. नवरात्रोत्सवात पाचव्या व सातव्या माळेला विशेष महत्व आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस भाविकांची तोबा गर्दी असते. देवीची आरती, भजन, किर्तन यामुळे नवरात्रातील सर्व दिवस देवीचा जागर सुरु असतो.