होमपेज › Satara › मांढरदेव घाटातील खुनाला वाचा फुटली

मांढरदेव घाटातील खुनाला वाचा फुटली

Published On: Apr 20 2018 1:19AM | Last Updated: Apr 19 2018 10:40PMसातारा/ओझर्डे : प्रतिनिधी

मांढरदेव घाटातील गुंडेवाडी गावालगत दि. 15 रोजी अनोळखी महिलेच्या झालेल्या खुनाला वाचा फुटली असून सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.  प्राथमिक माहितीनुसार मृत महिला व संशयित आरोपी हे मुंबई परिसरातील असल्याचे समजते. दरम्यान, याप्रकरणी काही जणांची उचलाउचलीही झाल्याचे समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी मांढरदेव घाटात अनोळखी अंदाजे 27 वर्षे वय असलेल्या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसर हादरून गेला होता. महिलेच्या हातावर बानू असे नाव लिहिल्याव्यतिरिक्‍त अन्य कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती. यामुळे सातारा पोलिसांसमोर गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. वाई पोलिसांसह एलसीबीचे पथक घटनेच्या दिवसांपासून कसून शोध घेत आहेत. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी सातारा पोलिसांनी सोशल मीडियाचाही आधार घेत राज्यात सर्वत्र मृत महिलेचे फोटो पाठवले होते.

खुनाच्या घटनेनंतर दोन दिवसानंतरही मृत महिलेची ओळख पटत नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढत होता. अखेर मंगळवारी दुपारी याप्रकरणी एलसीबीच्या पथकाला धागेदोरे सापडले. त्याआधारे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केल्यानंतर महिलेची ओळख पटत गेली. मृत महिला ही मुंबई येथील असून संशयित मारेकरीही मुंबई येथील असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शुक्रवारी या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यामुळे मृत महिलेचे पूर्ण नाव, मारेकर्‍यांची पूर्ण नावे, घटनेचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.