Mon, Jun 17, 2019 15:00होमपेज › Satara › फलटणमध्ये वाळू कारवाया झाल्या मॅनेज?

फलटणमध्ये वाळू कारवाया झाल्या मॅनेज?

Published On: Dec 30 2017 12:36AM | Last Updated: Dec 29 2017 10:23PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

ढवळ (ता. फलटण) येथे बेकायदा वाळू उपशावर झालेली कारवाई स्थानिक यंत्रणेला हाताशी धरून मॅनेज झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. चार वाहनांवर कारवाई झाली मात्र,  दंड करणे किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल न करताच संबंधितांना सोडून देण्यात आल्याचा आरोप होत आहे. या परिसरात वाळूचा बेफाम उपसा सुरू असूनही अशा बोगस कारवाया केल्या जात असल्याने स्थानिक प्रशासनाकडे संशयाने पाहिले जात आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

यावर्षी वाळू ठेक्यांचे लिलाव न झाल्याने सध्या  वाळूमाफियांची चांदी आहे. फलटण तालुक्यात बेकायदा वाळू उपसा वाढला आहे. सालपे, हिंगणगाव परिसरात ठोस कारवाई झालीच नाही. तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशाचे सविस्तर वृत्त दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध केल्यावर तीच माहिती घेत महसूलच्या स्थानिक यंत्रणेने बोगस कारवायातून खिसे भरायला सुरुवात केल्याचे ढवळमधील प्रकाराने उघड केले. महसूलची स्थानिक यंत्रणा कारवाया मॅनेज करत आहे.

ढवळमधील चार-पाचजण महसूल यंत्रणेवर पाळत ठेवून बर्‍याच महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर चोरुन वाळू उपसा करतात. लागेबांधे असल्यामुळे आमच्यावर कारवाई होणारच नाही, या अविर्भावात यापैकी काहीजण असतात. ढवळमध्ये वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर लवाजमा घेवून घटनास्थळी दाखल झालेल्या महसूल यंत्रणेतील संबंधितांनी कारवाईविना वाहने सोडून दिली. त्यामुळे  कारवाईकडे बघण्याचा संशय बळावला आहे. या बोगस कारवाईची जोरदार चर्चा ढवळासह संपूर्ण तालुक्यात आहे. याप्रकरणातील संबंधितांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई, करावी अशी मागणी तालुकावासियांतून होत आहे.