Mon, Aug 19, 2019 13:21होमपेज › Satara › साताऱ्यात वृद्धाला ३६ लाखाला फसवले

साताऱ्यात वृद्धाला ३६ लाखाला फसवले

Published On: Aug 29 2018 2:30PM | Last Updated: Aug 29 2018 2:30PMसातारा : प्रतिनिधी

प्लॉट देतो असे सांगून वृद्धाची ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३६ लाख रुपये घेवून त्याबदल्यात नावावर असलेला प्लॉट देतो असे सांगून वृध्दाकडून पैसे घेतल्यानंतर प्लॉट न देता फसवणूक केली.  याप्रकरणी महेश जयराम निकम (रा.कोडोली) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानदेव कृष्णा यादव (वय ७२, रा.सदरबझार) यांनी  तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित महेश निकम याला व्यवसायासाठी व बँकेचे कर्ज असल्याने ते फेडण्यासाठी पैशांची गरज होती. तक्रारदार व संशयिताची ओळख होती. संशयिताने तक्रारदार यांच्याकडे पैशांची मागणी केली व त्याबदल्यात एमआयडीसी येथील प्लॉट नावावर करुन देतो असे सांगितले. यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी संशयित महेश निकम याला ३६ लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर तक्रारदार यांनी प्लॉट नावावर करुन देण्यासाठी नोटरी करण्यासाठी सांगितले.

यावेळी तक्रारदार याने आज, उद्या करु असे सांगत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. संशयित प्लॉट नावावर करुन देत नसल्याने तक्रारदार यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. यावेळी संशयिताने ‘पैसे देणार नसल्याचे सांगून धमकी दिली,’ फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर अखेर तक्रारदार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास फौजदार नानासाहेब कदम करत आहेत.