Thu, Aug 22, 2019 11:14होमपेज › Satara › युवतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तरुणाला पाच वर्षांची सक्तमजुरी  

युवतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तरुणाला पाच वर्षांची सक्तमजुरी 

Published On: May 05 2018 3:28PM | Last Updated: May 05 2018 3:31PM सातारा : प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका युवतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाला सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने सक्त मजूरीची शिक्षा ठोठावली आहे. माझे- तुझे प्रेम आहे. माझ्याशी विवाह कर अन्यथा तुझा ठरलेला विवाह मोडून टाकीन, अशी धमकी तरुणाने मृत युवतीला दिली होती. युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समीर उर्फ मोहसीन उर्फ कानया जावेद कोतवाल (वय ३०) रा. राजसपुरा पेठ, सातारा याला पाचवे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांनी ५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  समीर उर्फ काल्या जावेद कोतवाल  मृत युवती एकमेकांना ओळखत होते. समीर कोतवाल याची इच्छा होती की, तिने त्याच्याशी विवाह करावा. त्याने आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. परंतु पीडितेने त्याला नकार दिला. संबंधित युवतीच्या घराच्यांनी तिचा विवाह ठरवला. हे समीरला समजताच समीरने तिच्यावर मानसिक दडपण आणण्यास सुरुवात केली. तो युवतीला विविध प्रकारे धमकी देऊ लागला. समीरच्या धमकीनंतर पीडितेने  ९ मे २०१५ मध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कण्हेर धरणावर  जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. 

याबाबत मृत युवतीच्या वडिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार तपास अधिकारी फौजदार एस टी साठे व सहाय्यक पोलीस निरीक्षक  जाधव यांनी तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी वकील महेश उमाकांत शिंदे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडून १८ साक्षीदार तपासले. त्यामधील चार साक्षीदार फितूर झाले होते. परंतु, न्यायालयाने वस्तुनिष्ठ पुरावा ग्राह्य धरून आरोपी समीर उर्फ मोसीन  उर्फ जावेद कोतवाल याला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली  या प्रकरणी प्रॉसिक्यूशन स्कॉडचे शमशुद्दीन शेख ,कबुले, सुनील सावंत, कांचन बेंद्रे ,महिला हवालदार वाघ यांनी तपासात सहकार्य केले.