Sun, Jun 16, 2019 12:21
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › मलकापूर नगरपरिषदेच्या कक्षा रुंदावणार! 

मलकापूर नगरपरिषदेच्या कक्षा रुंदावणार! 

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 11:13PMकराड : अमोल चव्हाण 

न्यायालयाच्या आदेशानुसार मलकापूर नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाले आहे. नगरपरिषदेतबाबत राज्यपालांनी उद्घोषणा केली असून त्यानुसार मलकापूरच्या कक्षा रुंदावणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नगरपरिषदेच्या वाढीव क्षेत्राबाबत लगतच्या गावांमधील नागरिकांना 30 दिवसांत जिल्हाधिकार्‍यांकडे सूचना व हरकती करता येणार आहेत.

मलकापूर नगरपरिषदेबाबत राज्यपालांनी केलेल्या घोषणेमध्ये मलकापूर मूळ गावठाणासह पाचवड वस्ती, गोळेश्‍वर, जखीणवाडी, कोयना वसाहत, चचेगाव व कराड हद्दीतील काही सर्व्हे नंबरचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी 30 दिवसांच्या आत आपले म्हणणे, सूचना व हरकती सातारा जिल्हाधिकार्‍यांकडे कराव्यात, असेही राज्यपालांनी जाहीर केलेल्या उद्घोषणेत म्हटले आहे. त्यानुसार मलकापूरलगतच्या गावांमधील नागरिकांनी मागणी केल्यास त्यांचा मलकापूर नगरपरिषदेत समावेश होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सूचना व हरकती दाखल करणे गरजेचे असून त्यावर विचार करून शासन निर्णय घेणार आहे. याबाबत कोयना  वसाहतमधील काही नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सामूहिक सह्यांचे निवेदन देऊन मलकापूर नगरपरिषत कोयना वसाहतीचा समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये त्यांनी सध्या मलकापूर नगरपंचायतीचे 24 बाय 7 नळ-पाणीपुरवठा योजनेसह अनेक सोयी-सुविधांचा लाभ कोयना वसाहतमधील नागरिकांना मिळत आल्याचे नमूद केले आहे.  मलकापूर नगरपंचायतीचे न्यायालयाच्या आदेशानंतर नगरपरिषदेत रूपांतर करण्यात आले. याबाबत मलकापूरमध्ये राजकीय टीकाटिप्पणी व आरोप-प्रत्यारोप झाले. 

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही मलकपूर नगरपरिषद होत नसल्याने याबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. नगरपंचायत सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करून तसेच जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव पाठवूनही मुख्यमंत्री कार्यालयात याबाबत निर्णय होत नसल्याने काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. मलकापूरची लोकसंख्या 25 हजारांपेक्षा जास्त असून क वर्ग नगरपरिषद करण्याची मागणी त्यांनी न्यायालयासमोर केली होती. तसेच मलकापूर पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या व पाठीमागून प्रस्ताव आलेल्या राज्यातील दोन नगरपंचायतींचे नगरपरिषदेत रूपांतर करण्यात आले.

मात्र, मलकापूरबाबत निर्णय होत नसल्याची बाबही जनहित याचिका दाखल करणार्‍यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार न्यायालयाने शासनाला आदेश देऊन निर्णय घेण्याबाबत सूचना केल्या. शासनाने मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून मलकापूर नगरपरिषद करत असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू असून मलकापूर नगरपरिषदेमध्ये मूळ मलकापूर गावठाणासह आजूबाजूच्या गावांमधील काही भागाचा समावेश करण्याबाबतच्या हालचाली सुरू झाले आहेत.

मलकापूर गावठाणामधील मूळचे महसुली क्षेत्र तसेच पूर्वेकडे पाचवड वस्ती, गोळेश्‍वर गावातील काही सर्वे नंबर. दक्षिणेकडे जखिणवाडी गावातील काही भाग, पश्‍चिमेकडे जखिणवाडी गावातील काही भाग व कोयना वसाहत गावातील काही भागाच्या, पश्‍चिमेकडे चचेगाव मधील काही, उत्तर बाजूकडे कराड शहरातील काही सर्व्हेनंबरच्या सीमा दर्शवण्यात आल्या आहेत.