Wed, May 27, 2020 09:00होमपेज › Satara › मलकापूर नगरपालिका राज्यात आदर्श करणार

मलकापूर नगरपालिका राज्यात आदर्श करणार

Published On: Feb 07 2019 1:21AM | Last Updated: Feb 06 2019 10:50PM
कराड : प्रतिनिधी 

मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेला विजय ही विकासाची जीत आहे. विरोधकांच्या भुलथापांना न भुलता विकास कोण करू शकते हे ओळखून मतदारांनी त्यांच्या हातात सत्ता दिला आहे. त्यामुळे यापुढेही मलकापूरचा विकास अधिक गतीने सुरूच राहिली.  निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पुर्ण करण्यासाठी मी स्वत: मनोहर शिंदे व व नगरसेवकांच्या पाठीशी  भक्कमपणे उभा राहणार आहे. पुढील पाच वर्षात मलकापूर नगरपालिका राज्यात आदर्श करणार असल्याचे आश्‍वासन देत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांवरही कडाडून टीका केली. 

मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्षांसह 15 जागांवर निर्विवाद विजय मिळवला. यानंतर झालेल्या विजयी सभेत ते बोलत होते. यावेळी आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अ‍ॅड. उदयसिंह पाटील, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, अजित पाटील-चिखलीकर, नगराध्यक्षा निलम येडगे, इंद्रजीत चव्हाण, मनोहर शिंदे,  जयवंत जगताप, पं. स. च्या सभापती फरिदा इनामदार, हिंदूराव पाटील, नरेंद्र पाटील, राजेंद्र यादव यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते नगराध्यक्षा निलम येडगे यांच्यासह नगरसेवक व काँग्रेसच्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. 

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मलकापुरची लोकसंख्या ज्या वेगाने वाढली त्या तुलनेत मलकापुरला नागरी सुविधा दिल्या. निवडणुकीत विकास करणार्‍यांच्या पाठिशी मतदार राहिले. देशात ज्यांनी फसवणूक करून सत्ता मिळवली त्यांना मलकापुरवासियांनी थारा दिला नाही. खोटी आश्‍वासने देऊन त्यांनी लोकांना फसविण्याचा प्रयत्न केला. मात्र मलकापूरची जनता त्यांना फसली नाही.  

आ. जयकुमार गोरे म्हणाले, मलकापुरच्या निवडणुकीत समविचारी मंडळी एकत्र होती ते सर्वजण विजयी सभेलाही उपस्थित आहेत. विरोधकांनी काँग्रेसच्या विजयी सभेला कोण येतं? कोण नाही याची चिंता करू नये. निवडणुकीनिमित्त त्यांच्याजवळ आलेले भविष्यात त्यांच्याजवळ राहतात का? याचा विचार त्यांनी करावा. 

अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, मलकापुरची लढाई संपली असलीतरी आपल्याला एवढ्यावर थांबून चालणार नाही. 2019 हे निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे भविष्यात लोकसभा, विधानसभेची लढाई सुरू होत आहे. त्यावेळी पैशाचा वापर करून ही मंडळी पुन्हा तुमच्यासमोर येतील. त्यांना मलकापूरमध्ये जसा धडा शिकवला तसाच त्यावेळीही धडा शिकवून काँग्रेसच्या विचाराबरोबर सर्वांनीच राहिले पाहिजे. विरोधक निवडणुकीचा वापर सामान्य माणसांना गुलाम बनवण्यासाठी करत आहेत. मलकापुरच्या निवडणुकीत विरोधकांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडूण आणण्यासाठी वारेमाप पैसा वापरला. पण मलकापूरमधील नागरिक त्याला भुलले नाहीत.  

मनोहर शिंदे म्हणाले, निवडणुकीत जाहीरनामा प्रसिध्द करून दिलेली आश्‍वासने येत्या पाच वर्षात सर्वांना बरोबर घेऊन पुर्ण करणार आहे. झोपडपट्टीतील लोकांना शासनाकडून आडीच लाख व नगरपरिषदेतर्फे प्रत्येक घरकुलासाठी आम्ही 1 लाख रूपये देणार आहे. विकासकामात राजकारण न आणता विकास कामे करण्यास प्राधान्य देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न आहे. 
यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. आनंदराव पाटील, अजित पाटील-चिखलीकर, नगराध्यक्षा निलम येडगे, अ‍ॅड. राजाभाऊ उंडाळकर, अ‍ॅड. विकास जाधव, हनिफ मुल्ला, जयवंत जगताप यांची भाषणे झाली.   आनंदराव सुतार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक करून राजेंद्र यादव यांनी आभार मानले.    

साडेपाच कोटी भरा नाहीतर मी वसूल करणारच 

मलकापूर निवडणुकीनंतर डॉ. अतुल भोसले यांनी मलकापुरच्या विकासाला सहकार्य करू, असे सांगितले आहे. त्यांनी आता मलकापूरची काळजी करू नये. लोकांनी मलकापूरच्या विकासाची जबाबदारी आमच्यावर टाकली आहे. त्यांना सहकार्य करण्याची भावना असेल तर त्यांनी अगोदर थकलेला साडेपाच कोटी कर भरावा. मलकापूरच्या विकासासाठी कोरा चेक आणू म्हणणार्‍यांनी आपला कर भरण्यासाठी साडेपाच कोटींचा चेक नगरपारिषदेला द्यावा, तुम्ही देणार नसेल तर तो कर मी वसूल करणारच आहे, असा इशारा मनोहर शिंदे यांनी डॉ. अतुल भोसले यांना दिला. मलकापुरात फुकट मीटर देण्याची भाषा करणार्‍यांनी कराडकरांना पुढील सहा महिन्यात चोवीस तास पाणी देऊन त्यांना फुकट मीटर द्यावेत. जनता व्यासपीठावर त्यांचा जाहीर सत्कार करू, असे आव्हानही मनोहर शिंदे यांनी दिले.  
मनोहर शिंदेंनी पैशाची लंका जाळली...

मलकापूरचा विकास करणार्‍या हनुमानरूपी मनोहर शिंदे यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांची पैशाची लंका जाळली आहे. मनोहर शिंदे यांनी आता केवळ मलकापूर नगरपालिकेचा अभ्यास न करता कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचाही अभ्यास करावा. तिथे नेमके काय चालले आहे याची माहिती घ्यावी, असा सल्लाही आ. जयकुमार गोरे यांनी दिला.