Thu, Feb 21, 2019 04:59होमपेज › Satara › मलकापूरच्या विकासात काहींचा खोडा

मलकापूरच्या विकासात काहींचा खोडा

Published On: Jul 08 2018 1:46AM | Last Updated: Jul 07 2018 10:30PMकराड : प्रतिनिधी

मलकापूरला नगरपरिषदेचा दर्जा मिळू नये, यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. तेच मलकापूरच्या विकासाला खीळ घालण्याचे काम करत आहेत. रेठरे येथे दिलेला निधीही काहींना नाकारला आहे. तेच आता हस्तक्षेप करून मलकापूर दर्जा मिळू नये, यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

मलकापूर (ता. कराड) नगरपंचायतीकडून श्रीमती प्रेमलाताई चव्हाण व स्व. आनंदराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. आ. आनंदराव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, नगराध्यक्षा सुनिता पोळ, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराड आगाराचे जीवनधर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मलकापूरपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यातील अनेक शहरांना शासनाने नगरपरिषदेचा दर्जा दिला आहे. मलकापूरला नगरपरिषदेचा दर्जा मिळू नये, म्हणून काही विघ्नसंतोषी लोकांनी प्रयत्न केले. पायात पाय घालण्याचे राजकारण काही लोकांकडून सुरु आहे. त्यामुळे मलकापूरच्या विकासाच्या आड कोण येत आहे ? याचा विचार लोकांनी करणे गरजेचे आहे. जनतेला चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून आपण निधी दिला. मात्र रेठर्‍यात तो नाकारण्यात आला. विकासाच्या आड येणारे हेच लोक मलकापूरमध्ये हस्तक्षेप करत आहेत. मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मलकापूरची प्रगती सुरु असून त्यांना जनेतचा पाठिंबा मिळेल, असा विश्‍वासही आ. चव्हाण यांनी व्यक्त केला.

मनोहर शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांच्या पाठिंब्यामुळे अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून ते यशस्वी करून दाखवले आहेत. मात्र सध्या नागरिकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला धडा शिकवा, असे आवाहन मनोहर शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी विद्यार्थिनींना मोफत एसटी पास देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ करून श्रीमती प्रेमलाताई चव्हाण नगरवाचनालयाचे भूमिपुजन करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.