Mon, Apr 22, 2019 11:53होमपेज › Satara › मलकापूरमध्ये ३ ठिकाणी घरफोडी

मलकापूरमध्ये ३ ठिकाणी घरफोडी

Published On: Feb 23 2018 1:17AM | Last Updated: Feb 23 2018 1:17AMकराड : प्रतिनिधी

चोरट्यांनी मलकापूर, कोयना वसाहतीला पुन्हा लक्ष्य केले असून शास्त्रीनगरमधील एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. 

कोयना वसाहतीमधील दोन बंद फ्लॅट फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याची  घटना ताजी असताना दुसर्‍याच दिवशी शास्त्रीनगरमध्ये या घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन बंगल्यांतून अंदाजे एक तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीच्या वस्तू व एलईडी टीव्ही चोरट्यांनी गायब केला आहे. तर विश्रामनगर येथील अंगणवाडीच्या दाराचा कोयंडा तोडून रोकड लंपास केली. 

घटनास्थळावरून मिळालेल्या  माहितीनुसार  शास्त्रीनगर परिसरातील  रानडे हॉस्पिटलजवळ अधिकराव परशुराम कदम यांचा बंगला आहे. अधिकराव कदम हे सातारा येथे महिला व बालकल्याण शहरी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून काम करतात. ते सोमवार, दि. 19 रोजी इंदौर येथे ट्रेनिंगसाठी गेले होते. तर पत्नी सुरेखा  या बेलदरे येथे गेल्या होत्या. बुधवारी मध्यरात्रीनंतर बंगल्याच्या दाराचा कोयंडा तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी  आतील लोखंडी कपाटाचा दरवाजाही तोडला. कपाटातील पंधरा हजारांच्या चांदीच्या वस्तू लंपास केल्या. हॉलमधील अंदाजे 30 हजार रुपये किमतीचा     एलईडी टीव्हीही नेला. सुमारे 60 ते 65 हजारांचा ऐवज लंपास केला. बंगल्यामधील इतर साहित्यही विस्कटले होते. तर शेजारीच बधू शांताराम कदम यांच्या बंगल्याचा कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या बंगल्यात चोरट्यांना काहीही मिळाले नाही.

येथूनच जवळ प्रशांत मच्छींद्र शिंदे यांचा गिताभवन बंगला आहे. शिंदे कुटुंबिय नोकरीनिमित्त मुंबईत राहतात तर त्यांच्या आई मनिषा या शास्त्रीनगर  येथील बंगल्यात राहतात. त्याही आठ दिवसांपूर्वी मुलाकडे मुंबईला गेल्या होत्या. त्यांच्याही बंगल्याचा कोयंडा तोडून कपाटातील लहान अंगाठी, तीन महागडी घड्याळे, चांदीच्या वस्तू , दहा वर्षांपासून देवासाठी जमा केलेले पैसे व रोख रक्कम व महागडे नवीन दहा ते बारा ड्रेस, असा सुमारे पस्तीस ते चाळीस हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तसेच जवळच आसलेला सिरसट यांचा बंगला फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.

शास्त्रीनगर  मलकापूर येथे शिवाजीनगर 1, 2 आणि विश्रामनगर अशा तीन अंगणवाड्या एकाच ठिकाणी आहेत. बुधवारी रात्रीच्यावेळी बंद अंगणवाडीचा कोयंडा  तोडून अज्ञात चोरट्यानी लोकसहभागातून जमा केलेले 2 हजार 800 रूपये ठेवलेला डबा पळवून नेला आहे.या घटनेची नोंद शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.