होमपेज › Satara › मलकापूरला लवकरच नगरपालिका

मलकापूरला लवकरच नगरपालिका

Published On: Apr 27 2018 1:09AM | Last Updated: Apr 26 2018 10:19PMकराड : प्रतिनिधी 

कराड लगतचे अतिशय झपाट्याने वाढणारे शहर म्हणून मलकापूरकडे पाहिले जाते. शहराची वाढती लोकसंख्या व झालेला विकास लक्षात घेता दहा वर्षांतच हे शहर कराडशी स्पर्धा करू लागले आहे. त्यामुळे काही लोक मलकापूरला नगरपालिका करण्यामध्ये अडथळा निर्माण करत आहेत. मात्र, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मलकापूरला नगरपालिका व्हायला फार वेळ लागणार नाही, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केला. 

मलकापूर येथे नगरविकास प्रदर्शन व स्नेह मेळावा तसेच स्वच्छ सर्व्हेक्षणअंतर्गत पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सुनीता पोळ, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती शंकर चांदे, सौ. सुनंदा शेळके, प्राचार्य प्रफुल्ल चव्हाटे, विद्या थोरवडे, मंगल गलांडे, शंकर पाटील, तानाजी चावरे, वैशाली वाघमारे, विवेक पाटील, भरत पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मलकापूरच्या विकासाचा आढावा घेत असताना प्रत्येकवेळी नवनवीन योजना राबवून यशस्वी झाल्याची माहिती मिळत असल्याने आनंद होतो. समर्थ नेतृत्व लाभल्यामुळेच व शहरातील नागरिकांनी त्या नेतृत्वाला समर्थपणे साथ दिल्यामुळेच  फक्‍त दहा वर्षांत शहरात अनेक नाविण्यपूर्ण योजना राबवल्या आहेत. स्थानिक नेतृत्व पुढे आल्यानंतर व त्याच्याकडे विकासाची दृष्टी असेल तर काय होते? याचे उत्तम उदाहरण म्हणजे मलकापूर होय. शहरातील नागरिकांनी मनोहर शिंदे यांच्यावर दाखविलेला विश्‍वास त्यांनी सार्थ ठरवला आहे. विकासाचे ध्येय घेऊन एकहाती व एका विचाराने मलकापूर पुढे जात आहे. 

कोणतीही नवीन योजना राबवण्यासाठी मलकापूर हेच योग्य ठिकाण आहे. अत्याधुनिक मीटरमुळेच चोवीस बाय सात नळ पाणी पुरवठा योजना यशस्वी झाली आहे. चाळीस कोटींची भुयारी गटर योजना पूर्णत्वाकडे गेली असून योग्य वेळी मलकापूरने सांडपाण्याचे व्यवस्थापन केले आहे. अशी योजना राबवणारे राज्यातील नगरपंचायत असलेली मलकापूर हे पहिले शहर आहे.  

शहराचा विकास सुनियोजित पद्धतीने नियोजन करू झाला नाही तर सिमेंटची जंगले तयार होऊन शहराला बकाल स्वरुप प्राप्‍त होते. मात्र मलकापूरमध्ये गेल्या 10 वर्षांत विविध योजना राबवून अतिशय चांगल्याप्रकारे शहराचा विकास झाला आहे. घनकचर्‍याचे व्यवस्थापन शास्त्रोक्‍त पद्धतीने केले आहे. मलकापूर शहर आदर्श असून शहरवासियांनी येथील नेतृत्व जपले पाहिजे. येेथे विविध योजना राबवून त्या अखंडपणे सुरु ठेवत यशस्वी केल्याने देशभरातील लोकांना विशेष कुतूहल वाटते. हे सर्व केवळ पैशाने होत नाही तर लोकांनी नेतृत्वावर दाखलेल्या विश्‍वासामुळे ते शक्य आहे. 

मनोहर शिंदे म्हणाले, गेली 10 वर्षातील नगरपंचायतीची वाटचाल पाहिली असता काही गोष्टी करता आल्या. अजून काही करायच्या आहेत. या कालावधीत शहर वासियांनी विशेषत: महिलांनी चांगली साथ दिली. त्यामुळेच शहरात नाविण्यपूर्ण योजना राबवून विकास करता आला. मलकापूरची नगरपालिका होण्यासाठी सर्वसाधारण सभेत सर्वांनी एकमुखाने ठराव केला आहे. त्यामुळे तोही निर्णय लवकरच होईल. जागृत नागरिक म्हणून मलकापूरमधील प्रत्येकाने शहरासाठी कोण वेळ देतो, शहराचे हित कोण पाहतो, विकास कोण करु शकतो याचा विचार करण्याची गरज आहे. यावेळी धनश्री बलवान, प्रतिक्षा डोंगरे यांनी मनोगत व्यक्‍त केले. नगरपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी व महिला उपस्थित होत्या.