Wed, Mar 20, 2019 22:54होमपेज › Satara › स्वार्थासाठी मनोहर शिंदे यांच्याकडून अपप्रचार : अशोकराव थोरात 

स्वार्थासाठी मनोहर शिंदे यांच्याकडून अपप्रचार : अशोकराव थोरात 

Published On: Jun 21 2018 2:21PM | Last Updated: Jun 21 2018 2:21PMकराड(जि. सातारा) : प्रतिनिधी 

मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) येथे विरोधकांच्या शेत जमिनींवर आरक्षण टाकण्यात आले आहे. काही जवळच्या लोकांची आरक्षणे काढण्याचे प्रकार सुरू आहेत. स्वत:च्या जमिनीवर एकही आरक्षण नाही, याचा खुलासा करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव थोरात यांनी केली आहे. तसेच मलकापूर नगरपालिकेला आमचा आजही विरोध नाही, सर्व ठराव एकमताने करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही परिपूर्ण प्रस्ताव दाखल न केल्यानेच नगरपंचायतीची नगरपालिका होऊ शकलेली नाही. आता स्वार्थासाठी मनोहर शिंदे यांच्याकडून अपप्रचार केला जात असल्याची टीका अशोकराव थोरात यांनी केली आहे.

मनोहर शिंदे यांच्या पत्रकारपरिषदेनंतर अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली. नगरसेवक हणमंतराव जाधव, सुरज शेवाळे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सत्ता जाईल या भितीने परिपूर्ण प्रस्ताव दाखल केला नाही. खास बाब म्हणून नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देणे शक्य असतानाही ते केले नाही. 2013 पासून 2018 पर्यंत सभागृहात तसेच सभागृहाबाहेर डॉ. अतुल भोसले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कधीच विरोध केला नाही. मात्र डॉ. अतुल भोसले यांच्यासह मलकापूरच्या लोकांना आपण कधीच विश्वासात घेतले नाही. मुख्यमंत्र्यांनाही भेटला नाही. मुख्यमंत्र्यांनी गेल्यावर्षी मलकापूरमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल सात महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर 2017 मध्ये आपण भेटला होता. त्यावेळी परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. यामुळे अपूर्ण प्रस्ताव का दाखल केले? असे प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या चुकांवर आपण यापुढेही टीका करणारच असेही अशोकराव थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.