Tue, Jun 02, 2020 01:06
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › मलकापूरः ऑनलाईन बोगस अर्ज प्रकरणी कॉंग्रेस आक्रमक(Video)

मलकापूरः ऑनलाईन बोगस अर्ज प्रकरणी कॉंग्रेस आक्रमक(Video)

Published On: Nov 26 2018 2:48PM | Last Updated: Nov 26 2018 2:48PMकराडः प्रतिनिधी 

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावे मतदार यादीतून काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आले होते. याबाबत कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत सोमवारी शहरातून मोटरसायकल रॅली काढत प्रांताधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. माजी उपनगराध्यक्ष व कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या या रॅलीमध्ये मोठ्याप्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ऑनलाईन अर्ज करून मलकापूरमधील मतदार यादीतील ५६३ नावे कमी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघड झाल्यानंतर काँग्रेसने याबाबत आवाज उठवला. प्रथम मंडल अधिकाऱ्यांसमोर आक्रमक भूमिका घेत याची पूर्ण चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. त्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबत विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे तसेच ही बाब गंभीर असून याबाबत पोलिस ठाण्यात स्वतः एफआयआर दाखल करणार असल्याचेही स्पष्ट केले. 

त्यानंतर सोमवारी सकाळी मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष व कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. लक्ष्मीदेवी मंदिरापासून सुरू झालेली रॅली शहरातील मुख्य रस्त्याने मलकापूर फाट्यावर आली. तेथून राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावरून कोल्हापूर नाका येथे आली. येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर तेथून पुढे रॅली दत्त चौकात आली. येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रॅली प्रांत कार्यालयाजवळ आली. यावेळी उपस्थितांसमोर राजेंद्र यादव व मनोहर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तहसीलदार राजेंद्र चव्हाण व पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

 निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांना मतदार यादीतून वगळण्याचा काहींचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. लोकशाहीने लोकांना दिलेला मतदानाचा अधिकार अशा पद्धतीने ऑनलाईन बोगस अर्ज करून हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मलकापूरमधील मतदार यादीबाबत अशा स्वरूपाचे ५६३ अर्ज प्राप्त झाले असून ती संपूर्ण यादी आम्हाला एक महिन्याच्या आत मिळावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही मनोहर शिंदे यांनी दिला.