Wed, Sep 19, 2018 13:07



होमपेज › Satara › देसाई गटावर पराभवाची नामुष्की

देसाई गटावर पराभवाची नामुष्की

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 28 2018 10:32PM



मारूल हवेली : धनंजय जगताप

आ. देसाई गटाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मल्हारपेठ (ता.पाटण) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी बाजी मारली असून पाटणकर गटाने 7 जागांवर तर देसाई गटाने 4 जागांवर विजय संपादन केला. या निकालाने देसाई गटावर बालेकिल्ल्यात पराभवाची नामुष्की ओढावली असून पाटणकर गटासाठी ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली आहे.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या मल्हारपेठच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्‍का देणारा निकाल लागला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी तिसरे पॅनेल उभे करून दोन्ही गटांसाठी आव्हान उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होऊन निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. हर्षद कदम यांच्या पत्नी धनश्री कदम सरपंचपदी विजयी झाल्या. पाटणकर गटातील नवनाथ चिंचकर, निलेश चव्हाण, ज्योती पवार, भाग्यश्री हिरवे, अवधूत कांबळे, सुषमा चव्हाण, संगीता वाघ तर देसाई गटातून जयवंत पानस्कर, रेखाताई भिसे, जगन्नाथ पवार, तेजश्री शेटे या उमेदवारांनी विजय मिळविला.

मल्हारपेठमधील निकालाने प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली असून हर्षद कदम यांनी अनपेक्षितपणे सरपंचपदावर वर्चस्व ठेवले आहे. या निवडणुकीत देसाई गटासह हर्षद कदमांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत देसाई गटाने हर्षद कदम यांच्या विरोधात केलेल्या कामाचा वचपा काढला असून देसाई गटाला दणका दिला असल्याची चर्चा सुरू होती. तर देसाई व पाटणकर गटांत अटीतटीची लढत होऊन थोड्या मतांनी काही जागेवर विजय संपादन केला आहे. माजी जि.प. सदस्य आर.बी. पवार, पं.स.सदस्य सुरेश पानस्कर, देसाई कारखान्याचे संचालक अशोक डिगे, सरंपच गौरीहर दसवंत या देसाई गटातील स्थानिक मातब्बर नेत्यांचा करिश्मा यावेळी चालला नाही. तर देसाई गटात असणारा विस्कळीतपणा निकालावर परिणाम करणारा ठरला. देसाई गट व हर्षद कदम यांच्यातील मतभेदाचे पडसाद याही निवडणुकीत दिसून आले असून हा निकाल देसाई गटासाठी आत्मचिंतन करावयाला लावणारा आहे. दरम्यान, या विजयानंतर हर्षद कदम समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.