Fri, Mar 22, 2019 05:31
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › मतभेदांमुळे जिल्ह्यातील खेळाडू संपले

मतभेदांमुळे जिल्ह्यातील खेळाडू संपले

Published On: Dec 04 2017 1:34AM | Last Updated: Dec 03 2017 9:00PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनमधील मतभेदांमुळे जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. असोसिएशनचे सेके्रटरी बाळासाहेब भिलारे यांनीच कबड्डी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य पदाधिकारी, त्यांच्यातील मतभेदांमुळे चांगले खेळाडू संपल्याची खंत व्यक्त करत महाराष्ट्र राज्य कबड्डीला संघाचे माजी कर्णधार फिरोज पठाण यांनी जिल्हा कबड्डी असोसिएशनवर घणाघाती टिका केली आहे.

कराडचे सुपूत्र फिरोज पठाण यांनी रविवारी दै. ‘पुढारी’शी बोलताना कुमार गटात 1993 साली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सुमारे 21 वर्षांनी राज्याला प्रथमच अजिंक्यपद मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर सलग दुसर्‍या वर्षी कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डीत स्पर्धेत पठाण यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद कायम राखण्यात राज्य संघाला यश आले होते. 1993 साली राज्याचे तत्कालीन क्रीडा मंत्री नकुल पाटील यांनी 1 हजारांचे विकासपत्र संघातील प्रत्येक खेळाडूला दिले होते.

मात्र तत्पूर्वी 1990 साली सातारा जिल्हा संघास तीन खेळाडू कमी पडत होते. त्यावेळी कराडच्या लिबर्टीमधून मी, राजू जाधव आणि विनायक पवार या संघातून प्रथम खेळलो. यावेळी आपण 14 वर्षांचे असूनही 18 वर्षांखालील गटात खेळलो. 1991 साली आंध्रप्रदेशात झालेल्या कुमार अजिंक्यपद स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. मात्र त्यावेळी सेमीफायनलमध्ये पराभव झाला. पुढे शालेय गटातील राष्ट्रीय स्पर्धेत 1992 आणि 1993 अशी सलग दोन वर्ष प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. यावेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी खेळाडूंना पुरेशा सोयी - सुविधा मिळत नव्हत्या. अनेकदा स्पर्धेसाठी गेल्यावर एखाद्या सतरंजीवर झोपण्याची वेळ खेळाडूंवर येत होती. 

खर्चाचीही तजवीज खेळाडूंनाच करावी लागत होती, अशी खंत व्यक्त करत इस्लामपूरचे संजय जाधव, कोल्हापूरचे मारूती पाटील, परभणीचे जफर पठाण या खेळाडूंच्या कणखर साथीमुळेच राज्याला दोनदा अजिंक्यपद मिळवून देण्यात आपल्यास यश आल्याचेही फिरोज पठाण यांनी सांगितले. सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनमधील वादावर पठाण यांनी टिका केली. हे वाद लवकरात लवकर मिटले पाहिजेत, असे मतही फिरोज पठाण यांनी यावेळी व्यक्त केले. 

फिरोज पठाण बनले राज्य संघाचे व्यवस्थापक...

फिरोज पठाण हे सध्यस्थितीत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संघाचे मॅनेंजर म्हणून काम पहात आहेत. त्यांना रविवारी राज्याच्या पुरूष संघाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे पत्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून देण्यात आले. जिल्ह्यातील असोसिएशनच्या वादाचा फटका आपणासही बसल्याचे सांगत तब्बल 20 वर्षांनी आपणास राज्य संघाचे व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रियाही पठाण यांनी व्यक्त केली आहे.