Tue, Jul 16, 2019 11:37होमपेज › Satara › मायणी वैद्यकीय महाविद्यालयाला टाळे

मायणी वैद्यकीय महाविद्यालयाला टाळे

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 11:24PMमायणी : वार्ताहर

मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाची परवानगी न घेतल्यामुळे येथे शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले होते. या विरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर महाविद्यालयाला 20 कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, हा दंड न भरल्याने रविवारी महाविद्यालयाची इमारत, हॉस्पिटल व वर्ग सील केले असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 

वर्षभरापूर्वी मायणी येथील एम.बी.बी.एस वैद्यकीय महाविद्यालयाने विद्यार्थी प्रवेशासाठी परवानगी न घेतल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती. या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन व उपोषण केले होते. शासनाकडेही याचा पाठपुरावा  केला. मात्र, शासन पातळीवरही कोणताच तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांनी अखेर न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणात कोर्टाने एम.बी.बी.एस बंद करून महाविद्यालयाला 20 कोटी रूपयांचा दंड ठोठावला होता. या घटनेला वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने एक रूपयाही भरला नव्हता. त्यामुळे रविवारी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व त्यांच्या पथकाने महाविद्यालयाची एम.बी.बी.एसची प्रशासकीय इमारत, हॉस्पिटल आणि बी.ए.एम.एसचे वर्ग सील केले. दीड महिन्यांपूर्वी प्रशासनाने एम.बी.बी.एसचे काही लेक्चर हॉल सील केले होते. मात्र, आता पूर्ण इमारत व हॉस्पिटलच सील करण्यात आले आहे.