Mon, Apr 22, 2019 02:21होमपेज › Satara › पोलिसांनी बिस्किट खावून बांधला ‘एनर्जीचा पूल’ 

पोलिसांनी बिस्किट खावून बांधला ‘एनर्जीचा पूल’ 

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:54PMसातारा : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा पोलिसांनी जिल्ह्यात ‘हाय अलर्ट’ राहून त्यांनी आपले चोख कर्तव्य बजावले. दिवसभराच्या बंदोबस्तावेळी पोलिसांच्या पोटाची आबाळ होणार नाही याची खबरदारी घेत एसआरपीएफ पोलिसांनी त्यांच्या अभिनव ‘किचन’द्वारे पोलिसांना अन्‍न पुरवले तर शहर पोलिसांनीही ‘पुलाव’ देवून ‘एनर्जीचा पूल’ बांधला. दरम्यान, कुठेही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर येवू नये, यासाठी पोलिसांची 10 तास अक्षरश: भिरकिट राहिली.

सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर सातारा जिल्हा पोलिस दल या घोषणेनंतर विशेष अलर्ट झाले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी बंदच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारपासूनच जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत संचलन, मॉक ड्रील राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे गेल्या चार दिवसांमध्ये पोलिसांचा रस्त्यावरील, झोपडपट्ट्यांमधील ‘प्रेझेन्स’ खूप काही सांगून गेला. प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालय, बाँबे रेस्टॉरंट, वाढे फाटा, एसी स्टँड परिसर, अजंठा चौकात पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. याशिवाय बोगदा, राजवाडा, शाहू चौक, पोवई नाका, गोडोली, मोळाचा ओढा याठिकाणीही चार-चार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. सकाळपासूनच रस्त्यावर शुकशुकाट व पूर्णत: बंद पाळण्यात आला. 

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी अकरा वाजताच सातार्‍यातील प्रमुख ठिकाणी भेटी देवून बंदोबस्ताची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॅरेकेट्स लावण्यात आले होते व याठिकाणी पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांची टीम होती. प्रत्यक्ष ठिय्या आंदोलन व परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी पोनि पद्माकर घनवट, पोनि नारायण सारंगकर यांची शहरची टीम तैनात होती. याशिवाय अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार हे महामार्गावर बाँबे रेस्टॉरंट, जिल्हाधिकरी कार्यालय यासह कराड येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

दरम्यान, सकाळी आठ वाजल्यापासूनच पोलिसांचा बंदोबस्त लागल्याने तो सायंकाळी 6 वाजेपर्यंत कायम होता. या दहा तासाच्या मॅरेथॉन बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या जेवणाची परवड होवू नये, यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले गेले. एसआरपीएफचे पथक त्यांचे जेवण ते स्वत: तयार करुन पोलिसांना पुरवत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी शहर पोलिसांकडूनही पुलावचे पॅकेट पुरवण्यात आले. 

सातार्‍यात 3000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त..

मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी सातारा शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सातारा जिल्हा पोलिस दलातील सुमारे 1700 पोलिस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. याशिवाय 6 स्ट्रायकिंग फोर्स, 6 एसआरपीएफ, 5 आरसीपीच्या तुकड्या याशिवाय 632 होमगार्ड असा पोलिसांचा बंदोबस्त होता. दरम्यान, दौंडसह इतर जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त आलेला होता. अशाप्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 3000 पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. 

बालाजी ट्रस्ट व शेतकरी संघटनेची बांधिलकी

सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलक मराठा बांधवांना केळी वाटप करण्यात आले तर आंदोलनानंतर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बालाजी ट्रस्ट व शेतकरी संघटनेच्या या बांधिलकीचे मराठा बांधवांनी कौतुक केले.