Tue, May 26, 2020 00:19होमपेज › Satara › युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ; युवकाला ५ वर्षांची शिक्षा

युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ; युवकाला ५ वर्षांची शिक्षा

Published On: May 06 2018 1:11AM | Last Updated: May 05 2018 11:49PMसातारा : प्रतिनिधी

‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी विवाह कर, अन्यथा तुझा ठरलेला विवाह मोडून टाकीन’, अशी धमकी देऊन युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समीर ऊर्फ मोहसीन ऊर्फ कानया जावेद कोतवाल (वय 30, रा. राजसपुरा पेठ, सातारा) याला पाचवे अतिरिक्‍त जिल्हा सत्रन्यायाधीश आर. डी. देशपांडे यांनी 5 वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली. 

याबाबतची अधिक माहिती अशी, समीर कोतवाल याचे प्रगती सुपेकर (23, रा. गुरुवार पेठ, सातारा) या दोघांची ओळख होती. समीर कोतवाल याची इच्छा होती की प्रगती सुपेकर हिने त्याच्याशी विवाह करावा. प्रगतीला त्याबाबत बोलून दाखवल्यानंतर तिने मात्र, त्याला नकार दिला. 2015 मध्ये प्रगतीच्या कुटुंबियांनी तिचा विवाहदेखील ठरवला होता. दरम्यान, समीरला तिचा विवाह ठरल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने तिच्यावर मानसिक दडपण निर्माण केले. तिला विविध प्रकारे धमकी दिल्याने प्रगती मानसिक तणावाखाली होती.

समीर कोतवाल मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे अखेर समीरच्या त्रासाला कंटाळून प्रगती सुपेकर हिने दि. 9 मे 2015 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कण्हेर धरणावर जाऊन विष प्राशन केले. या घटनेतच तिचा मृत्यू झाला होता. याबाबत तिच्या वडिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी फौजदार एस. टी. साठे व सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एल. जाधव यांनी उर्वरित तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकारी वकील अ‍ॅड. महेश शिंदे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडून साक्षीदार तपासले. त्यामधील चार साक्षीदार फितुर झाले   होते. परंतु न्यायालयाने वस्तुनिष्ठ पुरावा ग्राह्य मानून आरोपी समीर उर्फ मोसीन  उर्फ जावेद कोतवाल याला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडचे शमशुद्दीन शेख, सुनील सावंत, कांचन बेंद्रे, महिला हवालदार वाघ यांनी सहकार्य केले.