Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › अपहरण करून युवतीला मारहाण

अपहरण करून युवतीला मारहाण

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 07 2018 2:03AM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील युवतीस शुक्रवारी सकाळी वृषभ विजय गवरे (रा. बाबर कॉलनी, करंजे) याने जबरदस्तीने मारुती कारमधून महादरे, ता. सातारा परिसरात नेऊन मारहाण केली. दरम्यान, युवतीच्या कुटुंबीयांनी याचा जाब विचारल्यानंतर गवरे याने घरात घुसून मारहाण करून साहित्याची तोडफोड केली.

शहर परिसरात एक 18 वर्षीय युवती कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. बाबर कॉलनीत वृषभ गवरे हा राहण्यास असून गेल्या काही महिन्यांपासून गवरे हा त्या युवतीस सातत्याने त्रास देत होता. याबाबतची माहिती त्या युवतीने कुटुंबीयांना दिली. शुक्रवारी ती युवती करंजे ते बुधवार नाका रस्त्यावरून चालत येत होती. वाटेत तिला गवरे याने जबरदस्तीने मारुती कारमध्ये बसवले. गवरे याने त्या युवतीला कारमधून महादरे, येथे नेले. याठिकाणी गवरे याने ‘तू माझ्याशी बोलली नाहीस तर जिवंत मारीन,’ अशी धमकी देत मारहाण केली.

मारहाणीवेळी गवरेने स्क्रू ड्रायव्हरने त्या युवतीच्या हातावर जखम केली. त्यानंतर युवतीला राजवाडा परिसरात आणून सोडून देत गवरे कारसह पसार झाला. याबाबतचा जाब कुटुंबीयांनी गवरे याला विचारला. यामुळे गवरेने युवतीच्या घरात घुसून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत तोडफोड केली. पीडित कुटुंबीयांनी याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.