होमपेज › Satara › महू-हातगेघरसाठी १०० कोटी देणार

महू-हातगेघरसाठी १०० कोटी देणार

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 10:04PMमेढा : वार्ताहर

बोंडारवाडी धरण मार्गी लावून महू-हातगेघर धरणासाठी 100 कोटींचा निधी देणार आहे. त्यासाठी भाजपला खंबीरपणे पाठिंबा द्यावा, असे आवाहन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

धरणग्रस्तांचे प्रश्‍न व भूविकास बँकेच्या कर्जमाफीसंदर्भात भणंग, ता. जावली येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जि.प. सदस्य दीपक पवार, माजी अर्थशिक्षण सभापती अमित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जि. प. सदस्य मनोज घोरपडे, काशीनाथ बैलकर, नानासो शिंदे, विजय शेलार, दत्ता साळूंखे आदी उपस्थित होते. 

ना. पाटील म्हणाले, येत्या दोन महिन्यात शेतकर्‍यांचे सर्वच प्रश्‍न मार्गी लागणार असून कोणतीही समस्या राहणार नाही. साडेतीन वर्षांत प्रत्येक गोष्टीचे निराकरण करण्यात सरकारला यश आले आहे. महू हातगेघर धरणासाठी धरणग्रस्तांच्या असणार्‍या सर्वच समस्या मार्गी लागतील. सातारा जिल्ह्यात आत्ता निम्या जागेवर भाजपचे आमदार निवडून येणार आहेत. या मतदार संघातील लोक खूप हुशार आहेत. येथील लोकांना चांगले समजते की हा रस्त्यांसाठीचा आलेला निधी कोणी दिला.

त्यामुळे याचे श्रेय विद्यमान आमदारांनी घेऊ नये.  भाजपच राज्याचा विकास करू शकते व येणारे सरकार हे भाजपाचेच असेल असा विश्‍वास ना. पाटील यांनी व्यक्‍त केला. वरवर कोणी कितीही काहीही केले तरी सर्वसामान्यांच्या डोक्यात मोदीच असून 2019 मध्ये सातारा- जावली मतदार संघात दीपक पवार हेच आमदार होतील. त्यामुळे पवारांनी कामाला लागावे. आम्ही पूर्ण ताकतीनिशी तुमच्या पाठीशी आहोत. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचे तसेच मेढा नगरपंचायतमधील विद्यमान दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या नगरसेवकांचा  ना. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्तविकात दीपक पवार यांनी धरणग्रस्तांच्या असणार्‍या अडीअडचणी, भूविकास बँकेच्या कर्जासंबंधी असणार्‍या समस्या गावांच्या नागरी सुविधांबाबत समस्या मांडल्या.