Tue, Sep 25, 2018 15:01



होमपेज › Satara › महिंद धरण दुरुस्तीसाठी निधी 

महिंद धरण दुरुस्तीसाठी निधी 

Published On: Dec 30 2017 12:36AM | Last Updated: Dec 29 2017 8:34PM

बुकमार्क करा




सणबूर : वार्ताहर

आ. शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्यावरुन शासनाच्या जलसंपदा विभाग व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने महिंद लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुरुस्तीच्या कामांकरीता 76.41 लक्ष रुपयांचा निधी शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुर केला असून या कामांची निविदाही काढली असल्याची माहिती आ. देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, पाटण तालुक्यात महिंद येथे शासनाच्या जलसंपदा विभागातंर्गत व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने बांधलेल्या लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याची दुरावस्था झाली असल्याने तलावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तलावातून होणारी गळती थांबविणेकरीता शासनाच्या जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास या तलावाची विशेष दुरुस्ती करणेसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा याकरीता आ. देसाई यांनी 2015 पासून शासनाच्या जलसंपदा विभागाकडे प्रयत्न केला होता.  

या कामांकरीता निधी मिळणेसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना प्रत्यक्ष भेटून पत्रव्यवहारही केला होता. तर यासंदर्भात नागपुरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेला आलेल्या तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून विशेष दुरुस्तीच्या कामांस निधी देणेबाबतची मागणी केली होती.

यावेळी राज्याचे ना. गिरीश महाजन यांनी महिंद येथील लघू पाटबंधारे तलावामधून होणारी पाण्याची गळती थांबविणे व या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामांस निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाने 76.41 लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ,सातारा यांचे अखत्यारित लघू पाटबंधारे विभाग, सातारा यांचेकडून महिंद येथील लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामांची निविदाही काढली आहे.  

या कामांमध्ये सांडवा, पुच्छ कालवा मजबुतीकरण करणेकरीता पुर्ण सांडव्यास संधानकामध्ये जॅकेटींग करणे, पुच्छ कालव्यामध्ये चेकवॉल बांधणे, सर्व्हीस गेटजवळ मातीचा भराव करणे आदी कामांचा समावेश आहे. महिंद येथील लघू पाटबंधारे तलावामधून होणारी पाण्याची गळती थांबविणे व या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या निधी मंजुर झाल्याने लवकरच या पावसाळयापुर्वी हे विशेष दुरुस्तीचे काम पुर्णत्वाकडे जावून तलावातील पाण्याची गळती थांबेल असेही आ. देसाई यांनी पत्रकात म्हंटले आहे.