Fri, Apr 26, 2019 19:59होमपेज › Satara › ‘जीव अडकले होते म्हणून दार तोडले’

‘जीव अडकले होते म्हणून दार तोडले’

Published On: Jan 02 2018 1:15AM | Last Updated: Jan 01 2018 10:47PM

बुकमार्क करा
परळी : सोमनाथ राऊत

मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. त्याच वेळी हे भयानक अग्‍नितांडव घडले. आगीमुळे लोक माझ्या केबिनमध्ये धावून आले. सुरुवातीस कोणाला बाहेर काढू कोणाला नको, हे समजत नव्हते. लोक एक्झिट डोअरजवळ उभे होते. नेमके काय करावे कोणालाच कळत नव्हते; मात्र लोकांचे जीव अडकले होते. म्हणून  दार तोडले अन् अनेक जीवांना सुखरूप बाहेर काढले, हा थरारक अनुभव सांगत होता मुंबईतील लोअर परेलमधील अग्‍नितांडवातून 200 जणांची सुटका करणारा सुरक्षारक्षक महेश साबळे. दै.‘पुढारी’मध्ये अग्‍नितांडवातील भयावह प्रसंग उलगडून दाखवताना त्याच्या अंगावर काटा आला होता. 

मुंबईतील लोअर परेलमधील अग्‍नितांडवातून 200 जणांची सुटका करणार्‍या महेश साबळे यांच्या  सतर्कतेमुळे लोअर परेलमधील खोलीतून 200 जणांची सुटका झाली. महेश साबळे हे सातारा तालुक्यातील खालची पिलाणी येथील रहिवाशी होत. या सुपुत्राने सोमवारी नव्या वर्षाच्या प्रारंभी  दै.‘पुढारी’च्या सातारा कार्यालयात येऊन पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन केले. त्यानंतर अग्‍नितांडवातील एक एक भयानक किस्से त्यांनी सांगितले. महेश साबळे म्हणाले मुंबईतील आग खरोखरच भयानक होती.

मी सातारकर असल्याचा अभिमान

अग्‍नितांडवातून लोकांना बाहेर काढणे खूप कठीण काम होते. जखमी होते त्यांना बाहेर काढताना डोळ्यांत अश्रू होते,  हाताचा थरकाप होत होता. मलाही ज्वालांनी वेढले होते; पण त्याही परिस्थितीत मागेपुढे पाहिले नाही. माझे काय व्हायचे ते होऊ दे, असे ठरवूनच जीवाची बाजी लावली. मृत्यूशी दोन हात करणे ही तर सातारकरांची खासियत. त्यानुसारच मी शक्य ते प्रयत्न केले. त्यात काही प्रमाणात यशही आले. सुमारे दोनशे जणांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या कुटुंबीयांची भावना पाहिल्यानंतर आपण सातारकर असल्याचा अभिमान वाटल्याचे महेश साबळे यांनी सांगितले.