Sat, Jul 20, 2019 08:49होमपेज › Satara › महेश नागरी पतसंस्थेत घोटाळा

महेश नागरी पतसंस्थेत घोटाळा

Published On: May 25 2018 1:12AM | Last Updated: May 24 2018 11:57PMसातारा : प्रतिनिधी

भवानी पेठेतील महेश नागरी पतसंस्थेत खोटी कागदपत्रे तयार करून 1 कोटी 21 लाख 8 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचा व्यवस्थापक अनिल जयसिंग जाधव (रा. करंडी, ता. सातारा) याच्यासह सहाजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. घोटाळ्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सातार्‍यात खळबळ उडाली असून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी यातील दोघांना अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

अनिल जयसिंग जाधव (वय 52), सुधीर जयसिंग जाधव (वय 45), अरविंद जयसिंगराव जाधव (वय 43) सौ. विजया अनिल जाधव, जयसिंग मानसिंगराव जाधव (सर्व रा. करंडी), अजित श्रीमंत देशमुख व शिवाजीराव बाजीराव देशमुख (दोघे रा. मांडवे, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित सर्व एकमेकांचे कुटुंबीय व नातेवाईक आहेत. याप्रकरणी सनदी लेखापरीक्षक हेमंत अनंत कुलकर्णी (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित अनिल जाधव हा महेश नागरी पतसंस्थेत व्यवस्थापक पदावर कार्यरत असल्याने तो या नागरी पतसंस्थेचा दैनंदिन कारभार पाहत होता. व्यवस्थापक असल्यामुळे संस्थेचे सर्व रेकॉर्ड त्याच्या नियंत्रणात होते. मात्र, अनिल जाधवने आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन खोटी कागदपत्रे तयार केली. त्या आधारे विविध कर्ज व सेव्हिंग खात्यांमध्ये खोटे हिशेब जमा-खर्च लिहिले. तसेच रेकॉर्डमध्ये व्हाईटनरच्या साह्याने खाडाखोड करुन नोंदी बदलून संशयितांनी आपापसात संगनमत केले. यातून संशयितांनी संचालक मंडळाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही व एकूण 1 कोटी 21 लाख  हजार रुपयांचा अपहार केला.

अपहाराची ही सर्व घटना 2004 ते 2013 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी लेखापरीक्षण झाल्यानंतर ही बाब समोर आली व त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यान, सातार्‍यातील मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या पतसंस्थेत अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल जाधव, सुधीर जाधव, अरविंद जाधव यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 29 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार फरास, पोलिस हवालदार आतिष घाडगे, प्रवीण गोरे, श्रीनिवास देशमुख, मोहन पवार, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, धीरज बेसके यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, पुढील तपास सुरु असून इतर संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.